मेट्रोच्या कांजूरमार्ग कारशेडच्या विरोधात केंद्र सरकारची याचिका जमीन हस्तांतरण बेकायदा असल्याचा दावा

Bombay HC.jpg

मुंबई : मुंबईतील मेट्रो रेल्वेच्या सहाव्या मार्गिकेची  कारशेड बांधण्यासाठी कांजूरमार्ग येथील १०२ एकर जमीन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (MMRDA) हस्तांतरित करण्याच्या मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईच्या विरोधात केंद्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

आधीच्या योजनेनुसार मेट्रो रेल्वेची ही कारशेड आरे वसाहतीत व्हायची होती. परंतु शिवसेना महाआघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर आरेमधील ८०० एकरचे क्षेत्र ‘संरक्षित वन’ म्हणून घोषित करून तेथील नियोजित कारशेड कांजूर येथे हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी कांजूर गावातील सर्व्हे क्र. २७५ मधील १०२ एकर जमीन कारशेडच्या कामासाठी ‘एमएमआरडीए’कडे हस्तांतरित करण्याचा आदेश १ आॅक्टोबर रोजी जारी केला. केंद्र सरकारने मीठ आयुक्तालयाच्या () मार्फत याविरुद्ध याचिका केली आहे.

मुख्य न्यायाधीश न्या. दीपंकर दत्त व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर थोडी चर्चा झाली. केंद्र सरकारने जमीन हस्तांतरणास अंतरिम स्थगिती देण्याचा आग्रह धरला. केंद्र सरकारतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग, राज्य सरकारतर्फे अ‍ॅडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी आणि ‘एमएमआरडी’तर्फे अ‍ॅड. साकेत मोरे यांचे म्हणणे थोडक्यात ऐकून घेतले. राज्य सरकार व ‘एमआमआरडीए’ला केंद्राच्या म्हणण्यास लेखी उत्तर देण्यास सांगून अंतरिम आदेशावर विचार करण्यासाठी पुढील आठवड्यात सुनावणी घेण्याचे ठरले. ती बहुधा ४ डिसेंबर रोजी होईल.

जेथे कारशोड बांधायचे ठरले आहे ती जागा आपल्या मालकीची आहे व तिचा ताबाही राज्य सरकारकडे नाही. त्यामुळे ती जमीन परस्पर ‘एमएमआरडीए’कडे हस्तांतरित करणे बेकायदा आहे, असे केंद्र सरकारचे मुख्य प्रतिपादन आहे. केंद्र सरकारचा असा दावा आहे की, संबंधित जमिनीवर माती परीक्षण सुरु केले गेले तेव्हा जमीन हस्तांतरणाची माहिती आपल्याला मिळाली. जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून आक्षेप घेण्यात आला. परंतु जिल्हाधिकाºयांनी त्याकडे दुर्लक्ष केले. या जमिनीची बाजारभावाप्रमाणे किंंमत मोजावी लागू नये यासाठी राज्य सरकार व ‘एमएमआरडीए’ परस्पर संगनमताने वागत आहेत व त्यामुळे आपला मोठे आर्थिक नुकसान होत आहे, असाही केंद्र सरकारचा आरोप आहे.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER