१ फेब्रुवारीपासून केन्द्रीय नौकऱ्यांमध्ये नव्या आरक्षणाचा लाभ मिळणार!

नवी दिल्ली :- केंद्र सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेत अनुसूचित जाती आणि जमाती, तसेच ‘ओबीसी’ वगळून अन्य समाजवर्गांमधील आर्थिक दुर्बलांसाठी १० टक्के स्वतंत्रआरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, १ फेब्रुवारी, २०१९ पासून या आरक्षणाचा लाभ पुढे जाहीर होणा-या केंद्र सरकारच्या नौकऱ्यांमध्ये मिळणार आहे.

१०३वी घटनादुरुस्ती लागू करण्यासाठी केंद्रीय कार्मिक मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार हे आरक्षण फक्त थेट भरतीच्या पदांना लागू होईल व ते पदोन्नतीने भरल्या जाणाऱ्या पदांसाठी लागू असणार नाही. हे आरक्षण नेमके कसे लागू करावे व त्यासाठीचे रोस्टर कसे बनवावे याविषयीच्या सविस्तर सूचना स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. याआधी सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाने या आरक्षणाचे आर्थिक निकष १९ जानेवारी रोजी जाहीर केले होते. या आरक्षणासाठीचे पात्रता प्रमाणपत्र राज्यांमधील तहसीलदार किंवा त्याहून वरच्या हुद्द्याच्या अधिकाऱ्याकडून दिले जाईल. या अधिकाऱ्यांना त्या त्या राज्यांमधील प्रचित नियमांनुसार उत्पन्न व मालमत्तेची काटेकोरपणे पडताळणी करूनच हे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे.