
मुंबई :- गुजरातमध्ये कोरोना रुग्णांची अॅक्टिव्ह संख्या महाराष्ट्रापेक्षा निम्मी आहे. लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र गुजरातच्या दुप्पट आहे. तर महाराष्ट्राच्या वाट्याला अवघ्या १ कोटी १४ लाख लसी आल्या आहेत, असे सांगत आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केंद्र सरकारच्या लसवाटप धोरणाविषयी नाराजी व्यक्त केली.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, “आम्हाला सरकारशी भांडायचे नाही. केंद्र सरकार महाराष्ट्राला सहकार्य करत आहे. मात्र, केंद्राने महाराष्ट्राला प्रत्येक आठवड्याला लागणारी ४० लाख लसींची गरज लक्षात घेतली पाहिजे. सध्या महाराष्ट्राकडे जवळपास ९ लाख लसी आहेत. हा साठा दीड दिवस पुरेल. १७ लाख लसी दिल्या असल्या तरी आठवड्याला ४० लाख या मागणीच्या तुलनेत हा साठा अपुरा आहे.”
मुंबई ही आर्थिक राजधानी आणि व्यापाराचे केंद्र आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र बराच मोठा आहे. त्यामुळे या ठिकाणी रुग्णांची संख्या जास्त आहे. सरकारने लसींचे वाटप करताना प्रत्यक्ष रुग्णसंख्या हा निकष न ठेवता प्रति दक्षलक्ष रुग्णांचे प्रमाण हे परिमाण वापरले पाहिजे, असे राजेश टोपे यांनी सांगितले.
‘हा’ आरोप खोटा
राजेश टोपे यांनी आकडेवारी सादर करत केंद्राच्या लसवाटप धोरणातील त्रुटी काढल्या. “महाराष्ट्रातील आरोग्ययंत्रणा कोरोना परिस्थिती नीटपणे हाताळत नाही, हा केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा चुकीचा आरोप आहे. आम्ही योग्यरीतीने काम करत आहोत. महाराष्ट्रापेक्षा दिल्ली, गोवा आणि पुद्दुचेरीत मृत्यूंची संख्या जास्त आहे. महाराष्ट्रात रुग्णांच्या बाबतीत पारदर्शक धोरण आहे. केंद्रीय आरोग्य खाते आम्हाला सहकार्य करत आहे. त्यांच्याविषयी तक्रार नाही. पण कोरोना लसींचा वाटप करताना गैरव्यवस्थापन होत आहे.” असे टोपे यांनी सांगितले.
ही बातमी पण वाचा : ‘महाराष्ट्राला केंद्राकडून संपूर्ण सहकार्य’, पवारांनी केंद्र सरकारवर व्यक्त केला विश्वास
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला