‘केंद्र आपली जबाबदारी झटकत आहे!’ सोनिया गांधींचे पंतप्रधान मोदींना पत्र

sonia gandhi - PM Modi - Maharastra Today
sonia gandhi - PM Modi - Maharastra Today

नवी दिल्ली :- सध्या देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या रुग्णांची वाढ होत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारनंही मोठं पाऊल उचलत १ मेपासून देशात १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना (Corona) प्रतिबंधात्मक लस देण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं (Serum Institute of India) राज्य सरकारांसाठी आणि खासगी रुग्णालयांसाठी आपल्या लसीचे दर जाहीर केले होते. या दरावरून काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडे लसीच्या दराबाबत विनंती केली आहे.

लसीकरणाच्या प्रक्रियेत बदल करण्यात यावा, राज्य सरकारांवरील संकट वाढेल आणि सामान्य लोकांना लसीकरणासाठी अधिक पैसे द्यावे लागतील. अशा परिस्थितीत एकच लस उत्पादक कंपनी तीन प्रकारचे दर कसे निश्चित करू शकते, असा प्रश्न उपस्थित करणारे पत्र सोनियांनी पंतप्रधान मोदींना लिहिले आहे. गेल्या वर्षीचा कटू अनुभव गाठीशी असताना आणि लोकांना झालेल्या त्रासाची माहिती असतानाही सरकार सातत्याने मनमानी आणि भेदभावपूर्ण नीतीने काम करत आहे, याबाबत आश्चर्य वाटतं, असंही सोनियांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. केंद्र सरकार १८ ते ४५ वर्षे वयोगटातील लोकांना मोफत लस देण्याच्या आपल्या जबाबदारीपासून दूर झाले आहे. केंद्राचं हे काम म्हणजे युवकांप्रति असलेल्या आपल्या उत्तरदायित्वापासून पळ काढणं असल्याची टीकाही सोनियांनी केली.

देशातील नागरिकांना लसीकरणासाठी जास्तीची किंमत मोजावी लागेल. राज्य सरकारांवरही त्याचा बोजा पडेल. देश संकटात असताना कोणतंही सरकार लोकांना त्रास देत नफेखोरीसाठी मोकळं रान कसं काय देऊ शकतं? असा सवालही सोनिया गांधी यांनी आपल्या पत्रातून विचारलाय. कोरोना लसीकरणाच्या प्रक्रियेचा पुनर्विचार केंद्र सरकारनं करायला हवा. संपूर्ण देशात लसीची समान किंमत असावी. केंद्र सरकारला आपलं हे धोरण त्वरित मागं घ्यायला हवं, जेणेकरून १८ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात लसीकरण करून घेता येईल, असंही त्यांनी पत्रात नमूद केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button