राजोआना याच्या दयेच्या अर्जावर निर्णयासाठी केंद्राला ‘शेवटची संधी’

Balwant Singh Rajoana - Supreme Court
  • राष्ट्रपतींकडे आठ वर्षे अर्ज आहे अनिर्णित

नवी दिल्ली : पंजाबचे माजी मुख्यमंत्री बिआंत सिंह (Beant Singh) यांची गोळ््या घालून हत्या केल्याबद्दल फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेला सिद्धदोष कैदी बलवंत सिंह राजोआना (Balwant Singh Rajoana) याने केलेल्या दयेच्या अर्जावर निर्णय घेण्यासाठी ‘शेवटची संधी’ म्हणून सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) केंद्र सरकारला दोन आठवड्यांचा वेळ दिला आहे.

राजोआना गेली २५ वर्षे तुरुंगात आहे व त्याचा दयेचा अर्ज गेली आठ वर्षे राष्ट्रपतींकडे अनिर्णित आहे. या अर्जावर निर्णय घेण्यात होत असलेल्या अक्षम्य दिरंगाईच्या कारणाने आपली फाशी रद्द करून ती जजन्मठेप करावी, अशी याचिका राजोआना याने सर्वोच्च न्यायालयात केली आहे.

याचिकेवर याआधीच्या तारखेला सुनावणी झाली तेव्हा सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने २६ जानेवारीपूर्वी निर्णय घ्या, असे केंद्र सरकारला सांगितले होते. तसेही यंदा प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला कोणीही परदेशी राष्ट्रप्रमुख येणार नसल्याने सरकारला निर्णय घेण्यास वेळ मिळू शकेल. शिवाय निर्णय घेण्यासाठी २६ जानेवारी हा दिवसही चांगला आहे, असे सरन्यायाधीश त्यावेळी म्हणाले होते.

त्यानुसार सरकारने काल सोमवार २५ जानेवरीपर्यंत निर्णय घेतला नाही. उलट प्रकरण पुढील सुनावणीला आले तेव्हा सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आणखी तीन आठवड्यांचा वेळ देण्याची विनंती केली.

राजोआनाचे ज्येष्ठ वकील मुकुल रोहटगी यांनी आणखी वेळ देण्यास विरोध केला. सरन्यायाधीशांनीही नाराजी व्यक्त करत सॉलिसटर जनरलना आणखी वेळ मागण्याचे कारण विचारले. त्यावर मेहता म्हणाले, ‘सध्या’च्या परिस्थितीत काहीही निर्णय घेतला तरी त्याचे इतर काही परिणाम होण्याची शक्यता आहे, म्हणून थोडा वेळ हवा आहे. मेहता यांच्या म्हणण्यातील ‘सध्याच्या परिस्थिती’चा संबंध बहुधा कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमांवर सुरु असलेल्या सेतकरी आंदेलनाशी असावा.

अखेरीस सरन्यायाधीश तीन नव्हे तर दोन आठवड्यांचा वेळ देण्यास नाखुशीने तयार झाले. मात्र ही शेवटची संधी असेल व यानंतर अजिबात वेळ वाढवून मिळणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER