स्मशानभूमीची छत कोसळून 25 जणांचा मृत्यू, तिघांना अटक

लखनऊ :- गाझियाबादच्या (Ghaziabad) मुरादनगर परिसरात रविवारी सकाळी स्मशानभूमीचा छत (Cemetery roof) कोसळून दुर्दैवी घटना घडली होती. याघटनेतील मृतांची संख्या वाढून 25 वर गेली आहे. पोलिसांनी या प्रकरणी कामाला जबाबदार असणारे निहारिका सिंह, सुपरवायजर आशिष सिंह आणि ज्युनिअर इंजिनिअर चंद्रपाल याला अटक करण्यात आली आहे. या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, ठेकेदार अजय त्यागी अद्याप फरार आहे.

राम धन नावाच्या एका वृद्धाचा मृत्यू झाल्याने त्यांचे पार्थिव मुरादनगर येथील उखरानी/ बम्बा रोडवरील स्मशानभूमीत आणण्यात आले होते. यावेळी अंत्यसंस्काराला राम धन यांच्या नातेवाईकांसह जवळपास 50 जण उपस्थित होते. सकाळपासूनच या परिसरात वादळी वाऱ्यांसह पाऊस सुरू होता. त्यामुळे लोक स्मशानभूमीत दाटीवाटीने जमा झाले होते. त्यावेळी अचानक स्मशानभूमीचं बांधकाम सुरु असलेले सिमेंटचं छत कोसळलं. त्यामुळे अनेक लोक या ढिगाऱ्याखाली दबले गेले. यानंतर लगेचच मदत कार्य सुरु झाले होते.

एनडीआरएफच्या पथकातील प्रवीण तिवारी यांनी मदतकार्य करताना अत्याधुनिक साधनांचा वापर केला असल्याचं सांगितले. स्मशानभूमीच्या कामामध्ये सिमेंट आणि वाळूचा योग्य प्रकारे वापर केला नसल्याचे समोर आले, असं प्रवीण तिवारी म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी घटनेची गंभीर दखल घेतली असून प्रशासनाला या दुर्घटनेचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाखांची आर्थिक मदतही जाहीर केली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER