काँग्रेसचे संकटमोचक डी के शिवकुमार यांच्या १५ ठिकाणावर सीबीआयचे छापे

नवी दिल्ली : काँग्रेसचे (Congress) संकटमोचक म्हणून ओळख असलेले कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार (D.k Shivkumar) व त्यांचे बंधू डी.के. सुरेश (D.k Suresh) यांच्या १५ पेक्षा अधिक मालमत्तांवर सीबीआयनं (CBI)आज छापेमारी केली.

केंद्रीय अन्‍वेषण ब्‍युरो अर्थात सीबीआयच्या पथकांनी आज सकाळी एकाचवेळी शिवकुमार यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या ठिकाणांवर छापे मारले आहे. भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात सीबीआयने ही कारवाई केली. सीबीआयने डीके शिवकुमार यांच्या कर्नाटक आणि मुंबईसह अन्न ठिकाणी असलेल्या कार्यालय आणि घरांवर छापे मारले आहे.

सीबीआयच्या टीमने बंगळुरूमधील शिवकुमार आणि त्यांचे भाऊ डीके सुरेश यांच्याशी संबंधीत असलेल्या १५ इमारतींवर सुद्धा छापे मारले आहे. यात डोडालाहल्‍ली, कनकपुरा आणि सदाशिव नगर मधील काही जुन्या घरांचाही यात समावेश आहे. या दोघांव्यतिरिक्त शिवकुमार यांचे निकटवर्तीय इकबाल हुसेन यांच्याही ठिकाणांवर सीबीआयने छापा टाकला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सक्तवसुली संचालनालय (ED) आणि इन्कम टॅक्स विभागाकडून टॅक्स चोरी आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची चौकशी सुरू होती. याच दरम्यान ईडीच्या हाती काही महत्त्वाची माहिती लागली होती. त्यानंतर ईडीने ही माहिती सीबीआयला दिली. त्यातून सीबीआयने आज सोमवारी छापे मारले. दरम्यान, शिवकुमार आणि त्यांचे बंधू सुरेश यांच्या मालमत्तांवर टाकण्यात आलेल्या धाडींमध्ये ५० लाख रुपये सापडल्याची माहिती समोर आली आहे. सीबीआयकडून अजून झाडाझडती घेतली जात आहे.

सीबीआयने केलेल्या या कारवाईमुळे कर्नाटकमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते सिद्धारमय्या यांनी हे सूडाचे राजकारण असल्याचा आरोप केला आहे. भाजपने सुडाच्या राजकारणातून ही कारवाई केली आहे, असा आरोप सिद्धारमय्या यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER