सीमाशुल्क आयुक्त पंडित यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल, सात निवासस्थानांवर सीबीआयची धाड

नवी दिल्ली :- सीबीआयने आज शुक्रवारी जीएसटी विभागाचे वादग्रस्त ठरलेले अतिरिक्त आयुक्त दीपक पंडित यांच्याविरुद्ध बेकायदेशीर संपत्ती गोळा केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. पंडित यांच्यासह त्यांची पत्नी आणि दोन मुलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक पंडित हे चित्रपट निर्माते अशोक पंडित यांचे भाऊ आहेत, हे येथे उल्लेखनीय.

सीबीआयने दीपक पंडित यांच्या मुंबईतील सहा निवासस्थानांवर आणि भुवनेश्वर येथील एका निवासस्थानावर आज धाड घातली. पंडित यांच्याकडे ३.९६ कोटींची बेहिशेबी मालमत्ता असल्याचे सीबीआयने म्हटले आहे. उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतापेक्षा ३७६ पटींनी ही मालमत्ता जास्त असल्याचा सीबीआयचा दावा आहे. पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार करीत त्यांनी ही मालमत्ता जमवली, असा सीबीआयचा आरोप आहे.