
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर हायकोर्टाने बुधवारी त्यांना चांगलंच फटकारलं. उच्चन्यायालयाने सिंग यांना थेट कनिष्ठ न्यायालयात जायला सांगितलं आहे. तसेच एफआयआर दाखल न करता सीबीआयची चौकशी कशी? थेट सीबीआयकडे चौकशी दिल्याचं एक तरी उदाहरण दाखवा, असा प्रश्न उपस्थित करतानाच तुम्ही कायद्यापेक्षा मोठे आहात का?, अशा शब्दात उच्च न्यायालयाने सिंग यांची कानउघाडणी केली आहे.
परमबीर सिंग यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी त्यांनी ताशेरे ओढले. गृहमंत्र्यांकडून गुन्हा घडत असल्याचे दिसत असताना तुम्ही गप्प का बसलात? तुम्ही गुन्हा दाखल का केला नाहीत? अशी विचारणा हायकोर्टाने परमबीर सिंह यांना केली. एक वरिष्ठ अधिकारी म्हणून तुम्ही तुमचे कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरला आहात. तक्रार किंवा एफआयआरशिवाय सीबीआय चौकशीच्या आदेशाची मागणीच कशी करता? असाही प्रश्न कोर्टाने यावेळी उपस्थित केला. एफआयआर दाखल न करता सीबीआय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याचं एक तरी उदाहरण दाखवा. त्यामुळे आधी या प्रकरणी एफआयआर दाखल करा. त्यानंतरच याप्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश दिले जाऊ शकतात, असं कोर्टाने सांगितलं.
यावेळी सिंग यांचे वकील विक्रम नानकानी यांनी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी पोलीस महासंचालकांना सादर करण्यात आलेल्या अहवालाकडेही कोर्टाचे लक्ष वेधले. या अहवालात बदल्याच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी त्यावर काहीही कारवाई करण्यात आली नाही, असंही नानकानी यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला