वाधवान बंधू सीबीआयच्या ताब्यात

सातारा : कोरोनाचे भयंकर संकट वाढत असल्याने लॉकडाऊन तसेच संचारबंदी लागू असतानाही सहलीसाठी महाबळेश्वरला जाणाऱ्या वाधवान बंधूंना सीबीआयने अटक करून आपल्या ताब्यात घेतले आहे. वाधवान बंधूंवर येस बँकेत घोटाळ्याचा आरोप आहे. या घोटाळ्याच्या चौकशीसाठी कारवाई करत सीबीआयने त्यांना महाबळेश्वर येथे जाऊन अटक केली. वाधवान बंधूंची सीबीआयने महाबळेश्वरच्या वाधवान हाऊसमध्ये चौकशीही केली. क्वारंटाईनमधून मुक्त केल्यानंतर आता सीबीआयने वाधवान यांना ताब्यात घेतल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

यानंतर पुढील कारवाईसाठी सीबीआय वाधवान बंधू  यांना सातारा पोलिसांच्या बंदोबस्तात मुंबईला नेणार आहे. ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. याआधी येस बँक घोटाळ्यातील आरोपी वाधवान बंधू आणि त्यांच्याशी संबंधित २३ जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांना ५ मेपर्यंत जिल्हा सोडण्यास प्रतिबंध घालण्यात आले होते. सीबीआय न्यायालयानेच तसे आदेश दिले होते. वाधवान कुटुंबाला ५ मेपर्यंत पोलीस बंदोबस्तात त्यांच्या महाबळेश्वर येथील निवासस्थानी राहण्याची मुभा न्यायालयाने दिली होती. लॉकडाऊन संपल्यानंतर त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल, असं सीबीआय न्यायालयानं स्पष्ट केलं होतं.

लॉकडाऊनच्या काळात जिल्हाबंदी असूनही, वाधवान कुटुंबीयांनी गृह विभागातून प्रवासाचं पत्र मिळवलं होतं. मात्र सीबीआयच्या आरोपींना  हे पत्र कसं मिळालं याची चर्चा केवळ राज्यात नव्हे तर देशभर रंगली होती. त्या पार्श्वभूमीवर सातारा पोलिसांनी तातडीने हालचाली करत, वाधवान बंधू आणि त्यांच्यासोबतच्या २३ जणांना पाचगणीत क्वारंटाईन केलं होतं. त्यांचा क्वारंटाईन काळ संपल्यावर त्यांना महाबळेश्वरच्या वाधवान हाऊसमध्ये ठेवण्यात आले होते.