एरण्ड – उत्तम वातहर क्षुप !

Castor oil

रस्त्याच्या आजूबाजूला शेतीच्या कडेला एरण्डाची झाडे मुबलक प्रमाणात दिसतात. एरण्डाची झाडे खूप जलद वाढतात म्हणूनच याला वर्धमान असा पर्याय आला आहे. पञ्चांगुल ( पाच बोटाप्रमाणे पत्र असलेला) उत्तान पत्रक ( पसरलेले पान असतात) उरुबूक ( उरु महान्तं वायुं वायति शोषयति – प्रकुपित वातशामक) अशी विविध नावे एरण्डा करीता आली आहेत. एरण्डाची मूळे पत्र बीज तेल औषधी प्रयोगार्थ वापरण्यात येतात. बऱ्याच ठिकाणी वर्षाचा धान्यसाठा करत असतांना गहू तांदूळ कडधान्य यांना कीड लागू नये म्हणून त्याला एरण्डतेल लावतात व उन्हात वाळवून साठवतात. केमिकल्स वापरण्यापेक्षा एरण्ड तेल जास्त प्रभावीपणे काम करते, किड लागू देत नाही व आहार्य द्रव्य असल्याने पोटात गेले तरी त्रासदायक नाही.

एरण्ड उत्तम वातशामक आहे. वेदनाशामक आहे. कंबर दुखत असेल, सियाटिकामुळे कंबर पाय सूज वा शूल असेल, आमवात, सांध्यावर सूज वा दुखत असेल तर एरण्डाची पाने गरम करुन बांधल्यास आराम पडतो. एरंड तेल मालीश करुन

  • एरण्ड पत्र गरम करुन लावल्यास वेदना कमी होतात.
  • एरण्ड उष्ण प्रकृतीचे असल्याने घाम आणणारे वात कमी करणारे आहे.
  • एरण्ड तेल उत्तम विरेचक आहे हे प्रसिद्धच आहे. पोट साफ होत नसेल एरण्ड तेल घेतल्यास सुखपूर्वक पोट साफ होते.
  • एरण्ड तेल उष्ण तीक्ष्ण असल्याने कृमिघ्न व कृमी निस्सारक आहे. लहान वा मोठ्यांनासुद्धा जंताचा त्रास होत असेल
  • तर एरण्ड तेल घेतल्याने जंत मरतात व सारक गुणामुळे मळा व्दारे शरीराच्या बाहेर काढल्या जातात. त्यामुळे शरीरात साठत नाही. एरण्ड तेलाच्या स्निग्धतेमुळे आतड्यांना चिकलेला मळ बाहेर निघतो.

मूळव्याधीत मलबद्धता होऊ नये मलाचे निस्सरण कष्टकारक होऊ नये व वेदना होऊ नये याकरिता एरण्ड तेल नियमित घेणे फायदेशीर ठरते. एरण्ड तेलाचा पोटावर नाभीवर पूरण केल्यास पोटाला आलेला फुगारा उदरशूल कमी होतो. पानांनी शेकल्याने वायुचे अधोभागातून निस्सरण होऊन आराम पडतो. भुवया विरळ असतील तर एरण्ड तेल मालीश केल्याने फरक पडतो. ज्या लहान बाळांना जन्मानंतर केस कमी असतात त्यांना एरण्ड तेलाने शिरोभागी मालीश करावी. एरण्ड तेल पत्र कष्टार्तव वर फायदेशीर आहे. मासिक पाळीच्या पूर्वी किंवा दरम्यान पोट कंबर दुखणे कमी स्त्राव होणे अशा तक्रारींवर एरण्ड तेल गरम पाण्यासह घ्यावे. एरण्ड पत्राने शेक घ्यावा. एरण्ड तेल सुश्रुताचार्यांनुसार शरीराच्या अधोभागातील दोषांना ठिक करणारे आहे असे विशेष नमूद केले आहे. म्हणजेच मूत्राशय मलाशय प्रजननसंस्था या सर्व स्त्रोतसांवर एरण्डतेल प्रभावी काम करते.

अर्थात उपचाराकरीता वैद्य युक्तीने एरण्डाचा वापर करीतच असतात. एरण्ड पत्र तेल बस्ति चिकित्सा आभ्यंतर प्रयोगार्थ वापरल्या जाते. अनेक व्याधींवर विविध कल्प एरण्ड चूर्ण तेल वापरून चिकित्सा केली जाते. आयुर्वेदात गंधर्व हरितकी एरण्डपाक एरण्ड मूलादि काढा अशा अनेक औषधी कल्यांमधे एरण्ड वापरण्यात येतो. सूज व्रण यावर पोल्टीस बांधण्याकरीता एरण्ड पत्राचा वापर करण्यात येतो. बऱ्याच त्वचा विकारांवर लेप लावून एरण्डपत्र बांधण्यास सांगितले आहे औषधी म्हणूनही ही पानं काम करतात व बॅडेजप्रमाणे उपयोग होतो. एरण्डाची झाडे बहुल प्रमाणात सापडतात गरज आहे त्याच्या गुणांची ओळख करून घेण्याची !

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER