जातीचा दाखला हरविला! सोलापूरच्या खासदारांची पोलिसात तक्रार

डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी

सोलापूर :- भाजपाचे सोलापूर येथील खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी आपला जातीचा दाखला हरविल्याची तक्रार पोलिसांमध्ये दाखल केली आहे. जात पडताळणी समितीने त्यांचा जातीचा दाखला अवैध असल्याचा निर्वाळा नुकताच दिला आहे. या पृष्ठभूमीवर, डॉ. महास्वामी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्याची माहिती पुढे आल्याने आता नवीन वळण या प्रकरणाला मिळाले आहे.

अक्कलकोट ते सोलापूर या प्रवासादरम्यान, दाखला गहाळ झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे. १४ फेब्रुवारी रोजी ही तक्रार दाखल करण्यात आली. जात पडताळणी कार्यालयात १५ फेब्रुवारी रोजी सुनावणी सुरू असताना, जातीचा दाखला उच्च न्यायालयात असल्याचे खासदारांच्या वकिलांनी सांगितले होते. त्यामुळे हा दाखला नेमका कुठे आहे, याबाबतचे गूढ वाढले आहे.