राज्यात जाती आधारित जनगणना व्हावी यासाठी बिहार विधानसभेत प्रस्ताव पारित

Bihar State Assembly

पाटणा : बिहारमध्ये आगामी जनगणना ही जाती आधारित होणार असून या आशयाचा प्रस्ताव सर्वपक्षीय सदस्यांच्या समंतीने मंजूर करण्यात आला आहे.

जातीच्या आधारावर जनगणना झाली पाहिजे या विचाराचे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे आधीपासूनच आहेत आणि तसा प्रस्तावही विधानसभेत मंजूर करण्यात आला. 2021 ची जनगणना ही जातीय आधारित व्हावी, अशी मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे या प्रस्तावात केली आहे.

मंगळवारी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जाती आधारित जनगणना व्हावी असा प्रस्ताव विधानसभेत मांडला. तो सर्व पक्षांच्या सदस्यांकडून पारित करण्यात आला. तशी घोषणाही विधानसभा अध्यक्ष कुमार चौधरी यांनी केली.

नितीश कुमार यांनी 2015 च्या निवडणुकांदरम्यान हा मुद्दा उपस्थित केला होता. तेव्हा राजद आणि जेडीयु या पक्षांची युती होती. राजद पक्षांसह इतर पक्षांनीसुद्धा या मुद्दाला पाठिंबा दर्शवला होता. राजद आमदार भाई विरेंद्र म्हणाले की पक्षाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी सुरुवातीपासूनच जाती आधारित जनगणनेची मागणी केली होती. बिहार विधानसभेत विरोधी पक्षाची मागणी मुख्यमंत्री कुमार यांना आज मान्य करावी लागली आणि हा प्रस्ताव पारित करण्यात आला.

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जाती आधारित जनगणना व्हावी अशी जुनी मागणी आहे. 1931 नंतर जाती आधारित जनगणना झाली नाही. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही जातीवर आधारित लोकसंख्येच्या आधारावर प्रतिनिधित्व मिळावे अशी मागणी केली होती होती.

गेल्या आठवड्यात बिहार विधानसभेत एनआरसी लागू न करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला त्याचप्रमाणे एनपीआर हा 2010 च्या तरतूदीनुसारच लागू करण्यात यावा, असा प्रस्तावही विधानसभेत पारित केला.
राज्यात जाती आधारित जनगणना व्हावी यासाठी बिहार विधानसभेत प्रस्ताव पारित