मुद्दाम ढिसाळ तपास करणार्‍या फौजदाराची खाते निहाय चौकशी

औरंगाबाद येथील कॉलेज युवतीच्या मृत्यूचे प्रकरण

औरंगाबाद: अकेफा मेहरिन या कॉलेज युवतीच्या स्कूटीला आपल्या मारुती स्विफ्ट डिझायर मोटारीने जोरदार धडक मारून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप असलेल्या आपल्या सहकारी पोलीस अधिकाºयास वाचविण्यासाठी औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. के. खातने यांनी मुद्दाम ढिसाळ तपास केला, असा ठपका उच्च न्यायालयाने ठेवला असून त्याबद्दल खातने यांच्यावर खातेनिहाय चौकशी करण्याचा आदेश पोलीस आयुक्तांना दिला आहे.

मेहरिनचे वडील मोहम्मद झहीर मोहम्मद आझम यांनी केलेल्या याचिकेवर न्या. रवींद्र घुगे आणि न्या. बी. यू. देबडवार यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. खातेनिहाय चौकशीत दोषी ठरल्यास खातने यांना जास्तीत जास्त शिक्षा दिली जावी. कारण लोकांचा पोलीस खात्यावरील ढासळत असलेला विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी चुकारांना अद्दल  घडविणे गरजेचे आहे असेही न्यायालयाने नमूद केले.

मेहरिन हिच्या स्कूटीला या पोलीस ठाण्यातील एक पोलीस उपनिरीक्षक संतोष पाटे यांनी मोटारीने धडक दिली होती. एवढेच नव्हे तर खाली पडलेल्या मेहरिनच्या अंगावरून मोटार नेऊन पाटे निघून गेले होते. २२ एप्रिल, २०१९ रोजी घडलेल्या या घटनेनंतर दोन दिवसांनी मेहरिन हिचा मृत्यू झाला होता. मेहरिनचा मृत्यू अपघाती नसून तिला जाणूनबुजून अंगावरून मोटार नेऊन ठार मारण्यात आले आणि  हे राक्षसी कृत्य करणारा पोलीस अधिकारीच असल्याने त्याला वाचविण्यासाठी गचाळ तपास केला जात आहे, असा आरोप करत मेहरिनच्या वडिलांनी याचिका केली होती. तपास अन्य एखाद्या नि:ष्पक्ष यंत्रणेकडे सोपवावा आणि पाटे यांच्याविरुद्ध खुनाचा खटला दाखल केला जावा, अशी त्यांची मागणी होती.

मध्यंतरी न्यायालयाने औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांना या प्रकरणात स्वत: लक्ष घालून चौकशी करण्यास सांगितले होते. आयुक्तांनी तशी चौकशी केली व तपासी अधिकारी खातने यांच्याकडून तपासात अनेक त्रुटी राहून गेल्याची कबुली दिली. आता या प्रकरणात सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याचे पुरवणी आरोपपत्र सादर केले गेले आहे व तपास सहाय्यक पोलीस आयुक्त हनुमंत भापकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

आरोपी पोलीस उपनिरीक्षक पाटे यांना निलंबित करण्यात आले आहे व त्यांची एक वार्षिक वेतनवाढ कायमस्वरूपी रोखण्याची त्यांना नोटीस देण्यात आली आहे, असे सरकारी वकिलाने सांगितले. परंतु खातने यांनी केलेल्या कृत्यांचे गांभीर्य पाहता त्यांच्यावरील ही प्रस्तावित कारवाई म्हणजे निव्वळ धुळफेक आहे, असे खंडपीठाने म्हटले. तपासातील या चुका व उणिवा खातने यांनी मुद्दाम ठेवलेल्या नाहीत तर त्यांच्याकडून अनवधानाने तसे झाले असण्याचीही शक्यता आहे, हे सरकारी वकिलांचे म्हणणेही न्यायालयाने अमान्य केले. न्यायालयाने म्हटले की, अनुभवी तपासी अधिकाºयाने आपण आरोपीला मदत करत आहोत अशी शंकाही घेता येणार नाही, अशी काळजी घेणे अपेक्षित आहे. खंडपीठाने असेही म्हटले की, या घटनेनंतर पाटे यांची अन्यत्र बदली केली गेली असती तरी आम्ही हे म्हणणे एकवेळ मान्य केले असते. पण तसे झाले नाही. ऑक्टोबर, २०२० मध्ये लाच घेताना पडले जाईपर्यंत ते त्याच पोलीस ठाण्यात काम करत होते. एका गुटखा विक्रेत्याला खोट्या केसमध्ये अडकवून त्याच्याकडून ५० हजार रुपये घेतान त्यांना पकडले गेले व त्यावरूनच त्यांना निलंबितही केले गेले आहे.

मेहरिनच्या वडिलांच्या वकिलाने अशी मागणी केली की, पाटे यांच्यावर खुनाचा खटला दाखल केला जावा. तसेच ही घटना घडली तेव्हा पाटे यांच्याच बॅचच्या पोलीस उपनीरीक्षक अनिता बागुल तेथे आल्या व त्यांनी ही घटना प्रत्यक्ष पाहणार्‍या  लोकांना तपासात काहीही न सांगण्याची धमकी देऊन लोकांनी त्यांच्या मोबाईलमध्ये केलेले घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग काढून टाकले. त्यामुळे त्यांनाही आरोपी करून त्यांच्यावरही पुरावे नष्ट करण्याचा खटला भरला जावा. परंतु आता आरोपपत्र दाखल होऊन खटला सत्र न्यायालयाकडे वर्ग झाला असल्याने आम्ही त्या न्यायालयावर सोडतो, असे खंडपीठाने म्हटले.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER