
- हायकोर्ट: प्रियांका सिंगविरुद्धच्या फिर्यादीत सकृद्दर्शनी तथ्य
मुंबई : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या दोन बहिणींविरुद्ध सुशांत सिंगची मैत्रीण व अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिने नोंदविलेल्या फिर्यादीपैकी एका बहिणीविरुद्धच्या फिर्यादीत सकृद्दर्शनी तथ्य असल्याचे मत नोंदवून मुंबई उच्च न्यायालयाने तिच्याविरुद्धची फिर्याद रद्द करण्याास नकार दिला.
रिया चक्रवर्तीने केलेल्या फिर्यादीवरून मुंबई पोलिसांनी सुशांत सिंगच्या प्रियांका (Priyanka Singh) व मितू सिंग (Meetu Singh) या दोन बहिणी तसेच दिल्लीच्या राममनोहर लोहिया इस्पितळातील एक डॉक्टर डॉ. तरुण कुमार यांच्याविरुद्ध फसवणूक करणे व सुशांंत सिंग यास आत्महत्येस प्रवृत्त करण्याचे (भादंवि कलम ४२० व ३०६) गुन्हे नोंदविले होते. ती फिर्याद आणि त्यानुसार नोंदविलेले गुन्हे रद्द करावेत यासाठी दोन्ही बहिणींनी याचिका केली होती. त्यावरील ६ जानेवारी रोजी राखून ठेवलेला निकाल न्या. संभाजी सिंदे व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने सोमवारी जाहीर केला.
खंडपीठाने असे मत नोंदविले की, प्रियांका सिंग हिच्याविरुद्धच्या तक्रारीत सकृद्दर्शनी तथ्य दिसत असल्याने तिच्याविरुद्धचा तपास सुरु ठेवण्यात काहीच अडचण असणार नाही. त्यामुळे पियांका सिंग व तिने ज्यांच्या शिफारशीवरून सुशांत सिंगसाठी औषधे आणली ते डॉ. तरुण कुमार यांच्याविरुद्ध नोंदविलेला ‘एफआयआर’ जिवंत राहील.
मात्र मीतू सिंग या सुशांत सिंगच्या दुसर्या बहिणीविरुद्धच्या तक्रारीत सकृद्दर्शनी तथ्य दिसत नसल्याचे नमूद करून न्यायालयाने तिच्याविरुद्धची फिर्याद व त्यानुसार नोंदविलेला गुन्हा रद्द केला.
डॉ. तरुण कुमार यांनी टेलिमेडिसिनच्या गाईडलाइन्सचे उल्लंघन करून अंमलीपदीर्थ प्रतिबंधक कायद्यान्वये (NDPS ACT) प्रतिबंधित अशा औषधांची शिफारस प्रियांकाच्या मार्फत सुशांत सिंग यास केली. नेहमीच्या डॉक्टरनी दिलेली औषधे सुरु असताना ही नवी औषधे घेऊ नयेत, असे मी सुशांतला सुचविले. पण त्याने ते ऐकले नाही. व कदाचित त्याच औषधांमुळे त्याचा १४ जून रोजी मृत्यू झाला असावा, असे रिया चक्रवर्तीने फिर्यादीत म्हटले होते. तिने ही फिर्याद ७ सप्टेंबर रोजी नोंदविली होती.
रियाने दुष्ट भावनेने सुशांत सिंगच्या मृत्यूनंतर तीन महिन्यांनी ही फिर्याद केवळ आपल्याला बदनाम करण्यासाठी केली, असा दोन्ही बहिणींंचा मुख्य बजाव होता. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नंतर या फिर्यादीचा तपास ‘सीबीआय’कडे देण्यात आला. ‘सीबीआय’नेही न्यायालयात मुळात मुंबई पोलिसांनी ही फिर्याद नोंदवून घेणेच चूक होते, अशी भूमिका मांडली होती. तर दिल्लीच्या ‘एम्स’मधील डॉक्टरांनी सुशांतचा मृत्यू कोणत्याही औषधाच्या सेवनानै झालेला नाही. ती आत्महत्याच आहे, असा अहवाल दिला होता. मात्र सुशांतचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा अंतिम निष्कर्ष ‘सीबीआय’ने तपासातून काढलेला नाही.
-अजित गोगटे
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला