
कोल्हापूर : गेली दोन वर्षे नियमित प्रवासी विमानसेवा देणाऱ्या कोल्हापूर विमानतळावरून (Kolhapur Airport) आता कार्गो सेवाही (Cargo Services) (मालवाहतूक) सुरू होणार आहे. येत्या गुरुवारपासून ही वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे. प्रवासी विमानातूनच पाचशे किलोपर्यंतच्या मालाची वाहतूक केली जाणार आहे. यामुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे.
दोन वर्षांपासून कोल्हापूर विमानतळावरून उडान योजनेंतर्गत नियमित प्रवासी विमानसेवा सुरू आहे. या विमानसेवेला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. उडान योजनेत तीन राज्यांच्या राजधानीला हवाई मार्गाने जोडणारे कोल्हापूर पहिले शहर आहे. यामुळे कोल्हापुरातून आणखी मार्गावर सेवा सुरू होणार असून त्याबाबत विविध कंपन्यांकडून अभ्यास सुरू आहे.
प्रवासी वाहतुकीबरोबरच मालवाहतुकीचीही मोठी संधी असलेल्या कोल्हापुरातून आता ‘कार्गो’ सेवा सुरू होणार आहे. त्याबाबतची तयारी सुरू आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या कार्गो क्लासकडून याबाबत अभ्यास सुरू असून कोल्हापुरातून कोणत्या प्रकारच्या मालाची वाहतूक करता येईल, कोणकोणत्या मार्गवर करता येईल याची चाचपणी सुरू आहे. पहिल्या टप्प्यात प्रवासी वाहतूक करणाऱ्या विमानातून मालवाहतूक सुरू केली जाणार आहे. त्याची सुरुवात येत्या गुरुवारपासून होण्याची शक्यता आहे. मालवाहतूक वाढत गेल्यानंतर स्वतंत्र कार्गो विमानाचाही वापर केला जाणार आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला