“करिअर की घर ? समतोल साधतांना !”

Career or home

दोन दिवसांपूर्वी माझ्या भाचीचा फोन आला. रविवार असल्याने सगळ आरामात सुरू होत. त्यामुळे नेहमीप्रमाणे गप्पांचा महापूर सुरू झाला. पण त्याला बांध घालत ती म्हणाली, “मावशी अगं तुझ्याशी थोडं बोलायचं होतं “. नेहमीच्या उत्साहाचा, एवढा गंभीर स्वर ऐकल्यावर मी पण थोडी काळजीत पडले.” हो अग , बोल ना !”

ती स्वतः कंप्यूटर इंजिनियर आहे. एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करते .नवीनच लग्न झालेले आठ महिने झाले. ती बोलू लागली,” आमचे एकत्र कुटुंब आहे. सगळे सुशिक्षित आहे. सासुबाई शासकीय निवृत्त अधिकारी आहे, तर समीर पण शासकीय अधिकारी. तुला माहितीच आहे !पण अगं हे सगळे लोक, त्यामुळे ठरलेल्या वेळी घरी येतात. माझ्या कामाच्या वेळा फारच विचित्र. आता घरातल्या लोकांना खटकतात, त्यांची नाराजी जाणवते आणि आर्थिक परिस्थिती उत्तम असताना मी नोकरी करण्याची तशी गरज नाही, असे ते म्हणतात अधून मधून ! खुप विरोध नाही करत पण नाराजी जाणवतेच ग ! काय करावं कळत नाही.

“आणि अगं ,माझी मैत्रीण सीए आहे. तिने पाच वर्षे एका फर्ममध्ये काम केलं. पण मुलाच्या जन्मानंतर नोकरी सोडली. सासू-सासरे दिवसभराची जबाबदारी नाही घेऊ शकत, आणि आई-वडील पुण्यात. आर्थिक गरज नाही, त्यामुळे एवढ मोठा शिक्षण घेऊन विचारी घरी बसली. इतर करिअरमध्ये पुढे जात असताना बघून तिला खूप कॉम्प्लेक्स येतो. तिचे उदाहरण पाहून तर मला फारच भीती वाटते.”

तिच्या सगळ्या प्रश्नांविषयी रविवार असल्याने आम्ही सविस्तर बोलू शकलो. त्यामुळे ती बरीच शांत झाली आणि “करून बघते मावशी “म्हणून तिने फोन ठेवला.

फ्रेंड्स ! ही समस्या आज खूप कॉमन आहे. मुख्य म्हणजे पूर्वी स्त्रियांचा नोकरी करण्यामागे केवळ आर्थिक गरज हा उद्देश होता, त्यामुळे सगळं काही धडपड करत दोन्हीचा तोल सांभाळण्याची कसरत त्या करीत असत. करावीच लागे. कारण स्त्रीची नोकरी खूप गौण समजली जाईल. त्यातल्या त्यात पैसे आणले म्हणून त्याचा स्वीकार व्हायचा.

पण आज परिस्थिती तशी नाही .मुली नोकरी करतात त्या स्वतःच्या आत्मसन्मानासाठी ,स्वतःच्या शिक्षणाचा बुद्धीचा उपयोग करण्यासाठी, स्वतःला prove करण्यासाठी! म्हणूनच ती केवळ” नोकरी नाही तर करिअर” आहे.

सगळ्या घरांमधून आजकाल त्याचा स्वीकार व्हायला लागला आहे. परंतु एवढ्या नोकरीतील कामाची ,वेळेची कल्पना नसते .लग्नापूर्वी नोकरीचे नेमके स्वरूप, कामाच्या वेळा, करियर संबंधीची मते मुली क्लियर करतात असं नाही. त्यामुळे शिक्षण, नोकरी यांचं कौतुक होतं. पण” घी देखा लेकीन बडगा नही देखा!”असं काहीसं होतं शेवटी घरातली सून, आई, पत्नी कुटुंबातील भूमिका आणि करियर यांचा संघर्ष होतोचं !

लग्न करायचं तर मुलींनी हे गृहीत धरायला हवं की करिअर करताना आपण जर लग्न करणार असू तर या भूमिकेला थोडातरी न्याय देता यायला लागणार आहे.

आज काल पूर्णच्या पूर्ण जबाबदारी सोपवली सुनेवर !असं होत नाही. घरातला जोडीदारही बरोबरीने मदत करतो. पण एक व्यक्ती म्हणून आपले आयुष्य जगायला तर आपण वेळ काढायला हवा ? आयुष्यातल्या त्या त्या टप्प्यावरचा आनंद आपण घालवत नाही ना याचा डोळसपणे विचार पाहिजे.

ती जबाबदारी स्वतःची आहे की आपण हा समतोल कसा साधणार आहे !

सासरच्या मंडळींची काळजीही याला कारण असू शकते. केवळ अन्याय करण्याचा त्यामागे हेतू नसतो.
मुलींवर पडणारा ताण अक्षरशः पहावत नाही. जेवायला धड वेळ नाही. सतत बैठी कामं! कमीत कमी स्वतःच्या तब्येतीसाठी व्यायाम तरी त्यांचा व्हायला हवा !सतत एसी मध्ये बसून सूर्यप्रकाशात जाण्याची त्यांच्यावर वेळच येत नाही. शारीरिक हालचाल होत नसल्याने शरीरातील कॅल्शियम योग्य पद्धतीने वापर होत नाही. मान ,पाठ ,पोश्चर यांचा त्रास मागे लागू शकतो. वजन वाढीचा त्रास, डोळ्यांचा त्रास, चष्म्याचा नंबर वाढणे .सगळ्यांचा सुना मुलींच्या तब्येतीवर होणारा परिणाम समोर दिसत असतो .हेही त्या नाराजीचं कारण असू शकत. स्त्रियांच्या आरोग्यासाठी या गोष्टींना किती महत्त्व आहे हे सगळ्या सुशिक्षित मुलींनी समजून घ्यायला पाहिजे. प्रत्येक वेळी आपल्या डायट संतुलित आणि सर्व गुणांनी युक्त कसे होईल, हे बघायला लागतं.

नोकरी सोडणे हा यावरचा उपाय नाही ! तर करिअर आणि घर, आपले आयुष्य यातला समतोल राखणे गरजेचे आहे. सुरुवातीपासूनच हे जमणं शक्य नसतं.

पण कधीतरी घराला घरपण येण्यासाठी, वैवाहिक आयुष्य चांगलं जगण्यासाठी मी काय करू शकते? आम्ही दोघं परस्परांसाठी वेळ कसा काढू शकतो ? घरातल्या लोकांच्या काहीएक मिनिमम अपेक्षा असतात ,की दोन शब्द बोलावे ,एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हावे ,दिवसभरातील पंधरा-वीस मिनिटे तरी सगळ्यांनी एकत्र काढावी वगैरे . शक्यतोवर ते करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे कारण ही मुळात त्या मुलींची ही गरज आहे ! त्यांनाही त्याच, त्याच विचारातून थोडतरी एक्स्पोजर आवश्यक असतं.

पाच दिवसांचा आठवडा असतो. म्हणून शनिवार-रविवार थोडा रिलॅक्सेशन, थोडा एकमेकांना वेळ देणं, थोडी जास्तीची काम, हे करत हळूहळू स्वतःच्या कार्यक्षमता आणि ताकद वाढवत नेता येते. टाईम मॅनेजमेंट या विषयी नवीन काही खरं म्हणजे अशा जॉब करणाऱ्यांना सांगण्यासारखे नाही. फक्त त्याचा व्यवहारात उपयोग करावा लागेल.

बरेचदा मुल झाल्यावर, कुठल्याही सोयी अभावी सोडलेली नोकरी ही आळशीपणा किंवा मौजमजेसाठी नसते. तर ती बाळासाठीच्या कर्तव्यासाठी असते. त्यामुळे विचार करताना आपले बाळ पहिल्यांदा पालथे पडले, पहिल्यांदा विटामिन ड्रॉप्स घेताना त्याने कसा चेहरा केला ,ते ओठ काढून कसे रडते ,आपल्या बोलण्याने हुंकार कसे देते हे क्षण अत्यंत आनंद व सुखद असतात. त्यावेळी त्याची मजा घ्यायला पाहिजे, पार्ट टाइम काम काही दिवस करता येते, ते करत असताना इतर संधी हळूहळू शोधता येतात.फक्त आपल्या फील्डच्या टच मध्ये या ना त्या स्वरूपात मात्र राहिला पाहिजे.

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ! त्याचा इथे उल्लेख करावासा वाटतो. आज-काल मदतीचा हात मागायला आवडत नाही. परंतु आपल्या मतांमध्ये थोडी लवचिकता ठेवली तर, मदतीला यायला दोन्हीपैकी कुणाचे तरी आई-वडील सहज मान्य करतात .शेवटी हा आनंद सगळ्यांनी मिळून घेण्याचा असतो. आत्या, मामा ,मावशी ही नाती बाळाला जास्त समृद्ध करतात. फक्त त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून बिनधास्त कामावर गेलं, आणि आल्यावर, ” फार त्रास दिला का ?” अशी आपुलकीने चौकशी करून केवळ आपल्या बरोबर त्यांच्यासाठी” एक कप कॉफी “करून दिली तर अशा छोट्या छोट्या गोष्टींनी ही नाती छान बहरतात ! घर आणि करिअर यांचा समतोल साधायचा असेल तर नात्यांना जपायला पाहिजे, नात्यांची इन्वेस्टमेंट करायला पाहिजे. ही “एक कप कॉफी ” कुठलाही प्रश्न कधीच येऊ देणार नाही .

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER