बँकेत भरण्यासाठी दिलेले ५५ लाख लांबविले

car-thief

कोल्हापूर : गांधीनगर (ता. करवीर) येथील दोन व्यापार्‍यांनी बँकेत भरण्यासाठी दिलेली ५५ लाखांची रक्कम परस्पर लांबविल्याची घटना घडली. संशयिताने रकमेसोबत जाताना एक चारचाकी गाडी चोरून नेली . रोख रकमेसह एकूण ६० लाखांचा मुद्देमाल नेल्याचा गुन्हा गांधीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, नितीन ट्रेडर्स या प्रकाश रमेश वाधवानी यांच्या फर्ममधील ३५ लाख रुपये व भगवानदास कुकरेजा यांच्या संतोष फूटवेअर या फर्ममधील २० लाख रुपये मोहनसिंग ( रा. चौनक पेन्सिल, शोहरक वस्ती सालारिया, ता. छेदुवा, जि. बारमेर, राजस्थान) याच्याकडे १ जुलै २०१९ रोजी बँकेत भरण्यासाठी दिले होते. मोहनसिंगने बँकेत न भरता पळ काढला. नीलसिंग राजपूत (रा. गांधीनगर) यांची पाच लाख किमतीची चारचाकी गाडी (एमएच ५० एल २३९८) मोहनसिंग सोबत घेऊन गेला.

प्रकाश रमेश वाधवानी (वय ३९, रा. सोना पार्क, हरिओम बंगलो, ताराबाई पार्क, कोल्हापूर) यांनी पोलिसात फिर्याद दिली. गांधीनगर येथे तीन वर्षांपूर्वी राहण्यास आलेल्या मोहनसिंग याचे शिवशक्ती नॉव्हेल्टी नावाचे दुकान आहे. त्याने भगवानदास कुकरेजा यांच्या ओळखीतून त्यांचा व फिर्यादी प्रकाश वाधवानी यांचा विश्‍वास संपादन केला. १ जुलै रोजी भगवानदास कुकरेजा व प्रकाश वाधवानी यांनी दोघांचे  मिळून ५५ लाख रुपये बँकेत भरण्यासाठी मोहनसिंग याच्याकडे दिले. पण त्याने बँकेत पैसे न भरता परस्पर त्याचाच नातेवाईक असणार्‍या नीलसिंग राजपूत यांची चारचाकी गाडी घेऊन पसार झाला. ही बाब २ जुलै रोजी भगवानदास व प्रकाश यांच्या लक्षात आली.