महिला टी-20 विश्वचषकासाठी सर्व 10 कर्णधार आहेत ‘तैय्यार’!

Female T 20

मेलबोर्न : महिलांची विश्वचषक टी-20 स्पर्धा दोन दिवसांवर आली आहे आणि सहभागी सर्वच्या सर्व 10 संघाच्या कर्णधारांनी आपल्या संघाच्या चांगल्या कामगिरीचा विश्वास व्यक्त केला आहे. दहाच्या दहा संघ ऑस्ट्रेलियात दाखल झालेले असून वेगवेगळ्या पर्यटन स्थळांना भेटी देत आहेत. यंदाची विश्वचषक स्पर्धा अतिशय अटीतटीची होईल असा सर्व कर्णधारांचा अंदाज आहे. योगायोगाने आंतरराष्ट्रीय महिला दिनीच म्हणजे 8 मार्च रोजी मेलबोर्न येथे अंतिम सामना खेळला जाणार आहे आणि त्यावेळी महिलांच्या क्रीडा स्पर्धेला सर्वाधिक उपस्थितीचा विश्वविक्रम नोंदला जाईल अशी शक्यता आहे.

यजमान ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंग हिला माहित आहे की घरच्या मैदानावर खेळणार असल्याने त्यांच्या संघावर अपेक्षांचे दडपण सर्वाधिक असेल. सुरुवात चांगली तर सर्व चांगले म्हणून सुरुवात चांगली करण्यावर आमचा भर असेल असे लॅनिंगने म्हटले आहे. मायदेशी विश्वचषक खेळायची संधी आयुष्यात एकदाच मिळत असते त्यामुळेच प्रत्येक संघ जिंकण्याच्या इराद्याने आलेला आहे तसे आम्हीसुध्दा जिंकण्याचेच ध्येय बाळगून आहोत असे म्हणणाऱ्या लॅनिंगच्या संघाचा पहिला सामना 21 रोजी भारताशी आहे.

सुनीलकुमारला कुस्ती खेळण्यासाठी भावाशी जिंकावी लागली होती शर्यत

दुसरीकडे भारतीय महिला 2017 मधील उपविजेतेपद यावेळी विजेतेपदात रुपांतरीत करण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील. यासाठी तीन वर्षांपूर्वीचा अनूभव महत्त्वाचा ठरणार आहे.

आपल्या संघाबद्दल कर्णधार हरमनप्रीत म्हणते की आमच्या संघाचा समन्वय दिवसेंदिवस मजबूत होत आहे आणि सर्वांचे विचार सकारात्मक आहेत. आम्ही जिंकलो तर तो फार मोठा विजय असेल. त्यासाठी आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करु.

श्रीलंकेची कर्णधार चामरी अटापट्टू हिची ऑस्ट्रेलियाविरुध्द कामगिरी चांगलीच आहे त्यामुळे ऑस्ट्रेलियात खेळण्यास ती उत्सुक आहे. ती म्हणते की मी माझा नेहमीचा खेळ करेल. मी स्वतः मोकळेपणाने आणि सकारात्मकरित्या खेळण्यावर विश्वास ठेवते आणि आता तेच तर करायचे आहे. आम्ही गेल्या मोसमात ऑस्ट्रेलियाविरुध्द खेळलो होतो आणि त्यांचा संघ सर्वोत्तम का आहे हे तेंव्हा आम्हाला बघायला मिळाले. खूप काही शिकता आले. किमान उपांत्य फेरी गाठण्याचे आमचे लक्ष्य आहे.

न्यूझीलंडची सोफी डेव्हिन विश्वचषक स्पर्धेत प्रथमच नेतृत्व करणार आहे. त्यांचा पहिला सामना श्रीलंकेशी आहे. नेतृत्वाबाबत नवखी असली तरी सोफी म्हणते की कर्णधारपद हा मोठा सन्मान आहे हे खरेच पण मी सुध्दा खेळाडूच आहे त्यामुळे मलासुध्दा चांगली कामगिरी करुन सहकाऱ्यांसमोर उदाहरण ठेवावेच लागणार आहे. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते हे खरे असले तरी आम्हाला शांतपणे खेळून चढउतारांवर मात करावी लागणार आहे.

‘अ’ गटातील शेवटचा संघ बांगलादेशची कर्णधार सलमा खातून आहे. आशिया चषक स्पर्धेत त्यांनी भारताला मात दिलेली आहे. आशिया कप हा फार चांगला अनुभव होता. पण आता विश्वचषकात ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडवर आम्हाला लक्ष द्यावे लागणार आहे. आमच्या 19 वर्षातील मुलांनी अलीकडेच विश्वविजेतेपद पटकावले आहे. आता वेळ आमची आहे.

‘ब’ गटात 2009 च्या पहिल्या विश्वचषक स्पर्धेचा विजेता इंग्लंडचा संघ आहे. त्यावेळी हिदर नाईट इंग्लिश संघात नव्हती पण तिने 2017 मध्ये इंग्लंडला दुसऱ्यांदा विश्वविजेत्याचा मान मिळवून दिला आहे. हिथर म्हणते 2017 च्या आणि या स्पर्धेत बरेच साम्य आहे पण विश्वचषकात तुमची कसोटी लागते आणि सुदैवाने या स्पर्धेआधी भारत व ऑस्ट्रेलियासोबतच्या तिरंगी मालिकेने आम्हाला चांगला सराव मिळाला आहे.

2016 च्या विश्वविजेत्या वेस्ट इंडिज संघाचे नेतृत्व स्टेफनी टेलर करत आहे.दोन वर्षांपूर्वी मायदेशी विश्वचषक असूनही त्यांना यश मिळाले नव्हते. ऑस्ट्रेलियाने त्यांचे आव्हान संपवले होते आणि आता त्यांना ऑस्ट्रेलियातच खेळायचे आहे पण बदल्याची कोणतीही भावना नाही असे टेलरने स्पष्ट केले आहे. त्यापेक्षा आम्ही आमच्या खेळावर लक्ष देणार असून अधिकाधिक चांगला खेळ करण्यावर भर देणार आहोत.हवामान खराब असल्याने इनडोअर सराव करावा लागतोय ही एक वाईट बाब आहे असे टेलर म्हणते.

डेन व्हॅन निकर्कचा दक्षिण आफ्रिकन संघ अंडरडॉग मानला जात आहे. सिया कोलिसीच्या संघाचे रग्बी विश्वविजेतेपद त्यांना प्रेरणा देण्यास पुरेसे आहे. नेल्सन मंडेलांच्या खेळ देशाला जोडून ठेवतो या विधानाची आठवण करुन देताना ती म्हणते की आम्ही सियाच्या संघासारखी जादू केली तर ती स्वप्नपूर्ती असेल.

आयसीसीच्या स्पर्धांतील अपयशांची मालिका खंडीत करण्याचे मोठे आव्हान बिस्मा मारुफच्या पाकिस्तानी संघासमोर आहे. यावेळी तसे होईल असे तिला वाटते या दृष्टीने मनस्थिती कशी चांगली राहिल याकडे आम्ही लक्ष देतोय. आम्हाला संधी निर्माण कराव्या लागतील आणि मोठी व महत्त्वाची स्पर्धा आहे असे दडपण न घेता खेळावे लागेल असे बिस्मा म्हणते.

थायलंडचा नवखा संघ प्रथमच विश्वचषक स्पर्धा खेळणार आहे, या स्पर्धेसाठी पात्र ठरुनच त्यांनी आश्चार्य घडवून आणले आहे. सोर्ननरीन टिपोकच्या नेतृत्वात ती आश्चर्यांची मालिका सुरु ठेवायाचा त्यांचा प्रयत्न असेल. चांगला खेळ करुन लोकांमध्ये आमची ओळख निर्माण करण्याची आम्हाला ही संधी आहे आणि चांगल्या खेळाने थायलंडमध्ये महिला क्रिकेट टेलिव्हिजनवरही यावे यासाठी आमचा प्रयत्न असेल असे सोर्ननरीनने म्हटले आहे.