सरपंचपदासाठी लिलाव करणाऱ्या दोन ग्रामपंचायतींची निवडणूक रद्द

Madan

मुंबई : नाशिक जिल्ह्यातील उमराणे (ता. देवळा) आणि नंदूरबार जिल्ह्यातील खोंडामळी (ता. नंदूरबार) या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच आणि सदस्यपदांसाठी लिलाव झाला होता. या जाहीर लिलावाबद्दलचे पुरावे प्राप्त झाल्यामुळे या ग्रामपंचायतींची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द केल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान (U.P.S. Madan) यांनी केली. उमराणे आणि खोंडामळी ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच आणि सदस्यपदांचा जाहीर लिलाव झाल्याबाबतच्या बातम्या प्रसिद्धिमाध्यमांमध्ये झळकल्या होत्या. त्याचबरोबर आयोगाकडे तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्या अनुषंगाने आयोगाने अहवाल मागविले होते.

जिल्हाधिकारी, निवडणूक निरीक्षक, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांचा अहवाल; तसेच विविध कागदपत्रे आणि ध्वनिचित्रफितींचे अवलोकन केल्यानंतर या ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे, असं मदान यांनी सांगितलं. खोंडामळी येथील लिलावप्रकरणी आधीच नंदूरबार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आता अधिक तपास करून भारतीय दंड विधानाचे कलम १७१ (क) अथवा अन्य कायद्यांतील तरतुदींनुसार संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करून आयोगास अहवाल सादर करावा, असे निर्देश नाशिक आणि नंदूरबारचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

केवळ काही ग्रामस्थांच्या एकतर्फी दबावात्मक निर्णयामुळे इच्छुक उमेदवारांना मुक्त वातावरणात निवडणूक लढविण्यापासून आणि मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रकार या दोन्ही गावांमध्ये झाला आहे. यातून लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांचा  आणि आचारसंहितेचा भंग झाल्याचे सकृद्दर्शनी सिद्ध झाले आहे. अशा प्रकारांमुळे निवडणूक लढविण्याची सर्वांना समान संधी प्राप्त होऊ शकत नाही. हे प्रकार टाळण्यासाठी निर्भय, मुक्त आणि पारदर्शक वातावरणात निवडणूक घेण्याची सांविधानिक जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर आहे. ही संविधानात्मक जबाबदारी पार पाडण्यासाठी आयोगाने या दोन्ही ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया रद्द केली आहे, असेही मदान यांनी सांगितले.

लिलावाची रक्कम ग्रामदेवता मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी

नाशिकच्या उमराणे गावात सरपंचपदासाठी जाहीर लिलाव करण्यात आला होता. विशेष म्हणजे हा लिलाव थोड्या थोडक्या नव्हे तर २ कोटी ५ लाख रुपयांत करण्यात आला. लिलावात जमा झालेली रक्कम गावातल्या ग्रामदेवतेच्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी वापरली जाणार असल्याने उमराणे ग्रामस्थांच्या या अनोख्या लिलावाची जोरदार चर्चा होती. ग्रामपंचायत निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आलेली असताना मतदानाच्या दिवशी कुठे दारू, कुठे पार्टी, कुठे पैसे वाटले जातील. हा खर्च टाळून गावात किमान ग्रामदेवतेचं मंदिर उभं राहील, या दृष्टीने ग्रामस्थांनी घेतलेल्या या निर्णयावर अनेक स्तरांतून कौतुकाचा वर्षाव झाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER