कॕनेडियन वेटलिफ्टरला तब्बल सहा वर्षानंतर का मिळाले अॉलिम्पिक सुवर्णपदक?

  • १० वर्षानंतर कशी ठरली ती कास्यपदकाची मानकरी?
  • कॕनडाच्या ख्रिस्तीन जिरार्डच्या आयुष्यातील अनपेक्षित आनंदक्षणांची आश्चर्यकारी कहाणी!

कॕनडाची वेटलिफ्टर ख्रिस्तीन जिरार्ड! हिने २००८ च्या बीजिंग अॉलिम्पिकचे कास्यपदक आणि २०१२ च्या लंडन अॉलिम्पिकचे सुवर्णपदक कमावले, पण तिला ही पदकं मिळाली या आठवड्यात..गेल्या सोमवारी! पण १० आणि सहा वर्षानंतर हे का घडले तर कॕनडा व ख्रिस्तिनच्या प्रामाणिकपणाचे हे बक्षिस होते.

त्याचे झाले असे की २००८ च्या बीजिंग अॉलिम्पिकवेळी ६३ किलोगटात ख्रिस्तीन चौथ्या स्थानी होती परंतु त्यावेळी दुसऱ्या स्थानी असलेली कझाकस्तानची आयरिना नेक्रासोव्हा ही डोप टेस्टमध्ये दोषी सापडली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय अॉलिम्पिक समितीने आयरिनाचे रौप्यपदक रद्द केले आणि त्यामुळे ख्रिस्तीन चौथ्या स्थानावरुन तिसऱ्या स्थानी येत कास्यपदकाची मानकरी ठरली.

असेच काहीसे २०१२ च्या लंडन अॉलिम्पिकबाबतही घडले. यावेळी ख्रिस्तीन मुळात तिसऱ्या स्थानी होती परंतु तिच्या पुढे असलेल्या दोघी, कझाकस्तानची माया मनेझा आणि रशियाची स्वेतलाना त्सारुकेव्हा या दोन्ही डोपींग टेस्टमध्ये पकडल्या गेल्या आणि अपात्र ठरल्या. आयरिना, माया व स्वेतलाना या तिघींचे संग्रहित नमुनेसुध्दा दोषी आढळून आल्यानंतर यंदा एप्रिलमध्ये आंतरराष्ट्रीय अॉलिम्पिक समितीने ख्रिस्तीन जिरार्डच्या या पदकोन्नतीची अधिकृत घोषणा केली. त्यामुळे सहा वर्षानंतर ख्रिस्तीनच्या आयुष्यात अनपेक्षितपणे अॉलिम्पिक सुवर्णविजेती आणि १० वर्षानंतर कास्यपदक विजेती बनण्याचे आनंदक्षण आले.

या दरम्यानच्या काळात ती खेळातून निवृत्तसुध्दा झाली आणि तीन मुलांची आईसुध्दा बनली. दुग्धशर्करा योग म्हणजे आपल्या आईला या पदकांनी सन्मानित करताना यावेळी तिच्या मुलांनीसुध्दा बघितले.

हा दिवस खास म्हणजे खासच आहे. ही पदकं स्विकारताना मला स्वतःचा तर अभिमान आहेच, परंतु या लढाईत माझ्या पाठीशी राहणारे माझे कुटुंबीय, माझे मित्र आणि माझ्या देशाचा, कॕनडाचाही मला अभिमान आहे, अशा भावना तिने ही पदके स्विकारताना व्यक्त केल्या. स्वच्छ आणि निर्भेळ खेळांसाठी कॕनडा देत असलेल्या लढ्याचे तिने कौतुक केले. आपण १४ वर्षांची असल्यापासून आपल्या चाचण्या घेतल्या गेल्या आहेत. आम्ही निर्भेळ आणि प्रामाणिक अॕथलीट आहोत. आंतरराष्ट्रीय पातळीवर आम्ही यश मिळवलेय कारण मेहनत कशी सफल करायची हे आम्हाला माहित आहे, सुवर्ण पदक जिंकण्यासाठी आपण आवश्यक ते सर्व केले असल्याबद्दल मला तीळमात्रसुध्दा शंका नव्हती, हे सुवर्ण पदक म्हणजे आमच्या निर्भेळतेची व प्रामाणिकतेची पावतीच आहे, असे ती सत्काराच्या उत्तरात म्हणाली.

 ही बातमी पण वाचा : कसोटीसाठी टीम इंडिया सज्ज, ऑस्ट्रेलियाने आखली रणनीती

या यशाने ख्रिस्तीन जिरार्ड ही कॕनडाची वेटलिफ्टिंगमधील पहिली अॉलिम्पिक विजेती ठरली आहे. अॉलिम्पिक वेटलिफ्टींगची एकापेक्षा अधिक पदके जिंकणारी ती पहिलीच कॕनेडियन आहे.