प्रियंका मोदींना हरवू शकेल?

Moreshwar Badgeलोकसभा निवडणुका देशभर होणार असल्या तरी उत्तर प्रदेश आखाडा बनले आहे. खरे रणकंदन उत्तर प्रदेशात आहे. निवडणुकीला एक महिना असताना, उत्तर प्रदेशच्या लोकसभेच्या ८० जागांसाठी कधीही झाले नाही असे राजकीय महायुद्ध पेटले आहे. ४७ वर्षे वयाच्या प्रियंका गांधी आणि त्यांच्यापेक्षा दोन वर्षाने मोठे त्यांचे बंधू राहुल यांनी आज लखनौमध्ये ९ तासांचा रोड शो करून शक्तिप्रदर्शन केले. कालपर्यंत घरात बसलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली.

काँग्रेसने ही निवडणूक भावनात्मक उंचीवर नेण्याची रणनीती बनवलेली दिसते. प्रियंकामध्ये लोक इंदिराजींना पाहत आहेत असा प्रचार पद्धतशीरपणे सुरु झाला आहे. पती रॉबर्ट वाडरा यांनी तर प्रियंकाला देशाच्या स्वाधीन करीत असल्याचे म्हटले आहे. रविवारी रात्री प्रियंका ट्विटरवर प्रथमच आल्या. आज दुपारपर्यंत त्यांना फॉलो’ करणाऱ्यांचा आकडा ७० हजारावर गेला. अध्यक्ष म्हणून राहुल गांधी पुढे पुढे करीत असले तरी काँग्रेसचा सारा फोकस प्रियंका यांच्यावर दिसतो आहे. मग प्रियंका खरेच गेमचेंजर ठरणार का?

गेमचेंजर वगैरे हे मीडियाने रंगवलेले चित्र आहे. एका रात्रीत देशातील हे सर्वात मोठे राज्य प्रियंका यांच्या हातात चालले जाईल, असे होत नसते. लाट असली तरच असे भूकंप येतात. आज मोदींची लाट नसली तरी प्रियंका यांचीही लाट नाही. १९८९ च्या निवडणुकीत काँग्रेस ह्या राज्यातून बाहेर फेकली गेली. तेव्हापासून ती बाहेर आहे. सध्या उत्तर प्रदेशात काँग्रेसचे फक्त दोन खासदार आणि सात आमदार आहेत. २८ वर्षांपासून पक्ष संघटनेचा पत्ता नाही. सारे दबंग नेते इतरत्र गेले आहेत. अशा हवेत प्रियंका काय हातपाय मारणार? ‘ब्रम्हास्त्र’ म्हणून प्रियंकांचे सध्या जोरदार मार्केटिंग सुरु असले तरी आई आणि भावाच्या प्रचारासाठी त्या आधीही नियमितपणे अमेठी आणि रायबरेलीत येत आल्या आहेत. या दोन जागांपलीकडे त्यांचा कुठे प्रभाव दिसलेला नाही. मग आताच त्या काय तिर मारतील? समाजवादी पक्षाचे अखिलेश प्रसाद यादव आणि बसपच्या मायावती यांना काँग्रेसशी आघाडी करावी वाटली नाही यावरून काँग्रेसची किती उपयुक्तता असेल याचा अंदाज येतो.

दलित आणि मुस्लिम मतांच्या जोरावर पूर्वी काँग्रेस उड्या मारायची. आज ह्या मतांवर मायावती आणि अखिलेश यादव दावा करीत आहेत. प्रियंका मतं आणणार कुठून ? भाजप आणि नरेंद्र मोदींची जादू पूर्वीएवढी नसेल, पण आहे. यावेळी तर कुंभच मदतीला आला आहे. चार हजार कोटी रुपये योगी सरकारने या कुंभावर खर्च केले आहेत. ‘मोदी सरकार चोर है’ म्हटल्याने लोक मते देतील असे राहुल यांना वाटत असेल तर ते मोठी चूक करीत आहेत. ज्या लोकांनी कधी विमान पाहिले नाही, त्यांना राफेलमधले घोटाळे पचनी पडतील अशी शक्यता नाही. आता तर ‘चोर’ या शब्दाचाच लोकांना ऍलर्जी वीट येऊ लागला आहे.

मोरेश्वर बडगे
लेखक हे ज्येष्ठ पत्रकार आहेत.