आपल्याला नाटक जमत नाही आणि नाटक करणारे टिकत नाहीत- रोहित पवार

Rohit Pawar

बुलडाणा : “माझा स्वभाव फार वेगळा आहे. मी आहे तसा आहे. मी दाखवत नाही. नाटक करणारे राजकारणात जास्त दिवस टिकत नाहीत. नाटक आपल्याला जमतही नाही. आपण कितीही मोठं झालो तरी अहंकार येऊ देऊ नका. तो आला तर दिल्ली सारखं होतं आणि अहंकारावर नम्रता, लोकहिताचे निर्णय, लोकसंवादाचा विजय होतो हे आपण नुकतंच पाहिलं आहे, असा खरमरीत टोला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी बुलडाणा येथे केंद्रातील भाजपा सरकारला नाव न घेता लगावला. सोमवारी (१७ फेब्रुवारी) बुलडाणा येथे राजर्षी शाहू महाराज फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप शेळके यांनी ‘युवा संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

यावेळी बुलडाणा जिल्ह्यातील युवक, युवतींच्या प्रश्नांना रोहित पवार यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली. यावेळी ते म्हणाले की, “आपल्या सर्वांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या सरकारने पूर्ण केल्या पाहिजेत. याबाबत माझं काही दुमत नाही. त्यासाठी हे सरकार, दुसरं सरकार किंवा कोणतंही सरकार असलं तरी जनतेच्या अपेक्षा पूर्ण व्हायला हव्यात. पण या सरकार आणि दुसऱ्या सरकारमध्ये फरक आहे. या ‘आपले सरकार’ने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. नुसतेच निर्णय घेऊन हे सरकार थांबलेले नाही तर त्याच्यावर कामही सुरू आहे.

अर्थसंकल्पातही त्याचा प्रत्यय येईल. काही निर्णय अपेक्षेपेक्षा वेगळे मात्र सरस राहतील. ‘पुन्हा येईन, पुन्हा येईनल’ म्हणणारं त्यांचं सरकार आहे, अशी मिस्कील टीका रोहित पवार यांनी केली. हे सरकार आपलं आहे असं मी यासाठी म्हणतोय की, लोकांनी नंतर कौल आपल्या बाजूने दिला. लोक आज हे सरकार स्थापन झाल्यानंतर खूश आहेत. आगामी काळातील राज्याच्या अर्थसंकल्पामध्येही अनेक लोकल्याणकारी सकारात्मक निर्णय अपेक्षित आहेत, असा दावा रोहित पवार यांनी केला.