प्रचाराचा शुभारंभ; पाच कोटी घरांवर दिसणार भाजपचा झेंडा

'मोदी' वगळून भाजपचा यंदा "मेरा परिवार भाजपा परिवार"

Campaign launch; BJP flag to appear on 5 crore houses

नवी दिल्ली: निवडणुकीची अधिकृत घोषणा होण्यासाठी आता अवघ्या काही आठवड्यांचा कालावधी शिल्लक आहे. घोडामैदान फार लांब नाही. त्यामुळे सर्वच पक्षांनी प्रचाराची जोरदार तयारी केलेली आहे. मागच्या निवडणुकीपासून भाजप प्रचार, प्रसार आणि प्रसारणात अधिक अग्रेसर राहिला आहे. यंदाही भाजपने वेगळ्या अजेंड्यासह पक्षाच्या प्रचाराची तोफ डागली आहे.

भाजपच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ मंगळवारी अहमदाबादमध्ये झाला. भाजपची ही विशेष प्रचार मोहीम महिनाभर चालणार आहे. तसेच यंदा प्रचारादरम्यान देशातील पाच कोटी नागरिकांच्या घरावर पक्षाचा झेंडा फडकविण्याचा भाजपचा निर्धार आहे.

यंदाच्या निवडणुकीत मोदींचा जयघोष टाळत भाजप म्हणून पुढे येऊन लोकांच्या घरात जाण्याचा प्रयत्न भाजप करणार आहे. म्हणूनच, प्रचाराची सुरुवात करताना भाजपने यंदा पहिल्यांदाच ‘मेरा परिवार, भाजप परिवार’ या घोषणेचा वापर करणे सुरू केले आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ‘हर हर मोदी, घर घर मोदी’ अशा आशयाची घोषणा तयार केली होती; पण यावेळी निवडणुकीसाठी पक्षाच्या घोषणेतून मोदी यांच्या नावाला वगळण्यात आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. यावेळी ‘मेरा परिवार, भाजप परिवार’ या घोषणेने निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी अहमदाबादमध्ये त्यांच्या घरावर पक्षाचा झेंडा फडकावून आणि पक्षाचे स्टिकर दाराला लावून या विशेष प्रचार मोहिमेची सुरुवात केली. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी अमित शहा यांनी दीनदयाळ उपाध्याय प्रेक्षागृहात उपस्थितांशी संवादही साधला.

प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या घरावर पक्षाचा झेडा लावावा. त्यासोबत आपला सेल्फी काढावा आणि तो सोशल मीडियावर शेअर करावा, अशी सूचना यावेळी अमित शहा यांनी देशातील कार्यकर्त्यांना केली. पाच कोटी घरांवर पक्षाचा झेंडा फडकाविण्याचा संकल्प पक्षाने सोडला आहे. त्यासाठी प्रत्येकाने झेंडा लावावा, अशी सूचना अमित शहा यांनी केली आहे. सोशल मीडियामध्ये हा फोटो शेअर करताना #MeraPariwarBhajapaPariwar या हॅशटॅगचा वापर करावा, असेही अमित शहा यांनी म्हटले आहे.