मुख्यमंत्री म्हणून आले आणि कोरोना आला. हा मुख्यमंत्र्यांचा पायगुण – नारायण राणे

narayan rane & Uddhav Thackeray

रत्नागिरी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील ठाकरे सरकारची वर्षपूर्ती झाली. मात्र जनतेची इच्छापूर्ती झाली नाही. हे ठाकरे सरकार कामकाजात शून्य आहे, असं सांगतानाच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि कोरोना आला. हा त्यांचा पायगुण आहे, अशी जहरी टीका भाजप (BJP) नेते नारायण राणे (Naryane Rane) यांनी केली.

ठाकरे सरकारला एक वर्षपूर्ण झालं. त्यानिमित्ताने नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर सडकून टीका केली. या सरकारला वर्षपूर्ती झाली. पण जनतेची इच्छापूर्ती झाली नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होताच कोरोना आला. हा त्यांचा पायगुण. कोरोना आला आणि संपूर्ण राज्यात हाहाकार उडाला, असं राणे म्हणाले. गेल्या वर्षभरात महाराष्ट्राचा कोणत्याच क्षेत्रात अव्वल नंबर आला नाही. इतकी महाराष्ट्राची पिछेहाट झाली आहे. पण कोरोनामुळे एकट्या महाराष्ट्रात 50 हजार लोकांचा मृत्यू झाला. इतर राज्यांच्या तुलनेत कोरोना मृत्यूंची महाराष्ट्रातील संख्या सर्वाधिक आहे. इतर कशात नाही, पण कोरोना बळी आणि कोरोनाच्या वाढत्या संख्येत महाराष्ट्र नंबर वन झाला आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

कोरोनावर उपाय योजना करण्यात हे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. औषधांचा पुरवठा आणि इतर उपाययोजनांमध्ये हे सरकार कमी पडलं आहे, असं सांगतानाच कोरोनाच्या नावाने राज्यात 3 हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे, असा दावा त्यांनी केला. ठाकरे सरकार निकम्मं आहे. त्यांनी काहीच कर्तृत्व केलेलं नाही. या सरकारने महाराष्ट्र उद्ध्वस्त करण्याचं काम केलं आहे. ही उद्धवशाही नसून बेबंदशाही आहे, अशी टीका त्यांनी केली.

खून करून आत्महत्या ठरवल्या

ठाकरे सरकारच्या काळात खून करून आत्महत्या दाखवण्यात येत असल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी केला. सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन हिला मारहाण करून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिचा खून करण्यात आला आणि आत्महत्या दाखवली. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचाही खून करून आत्महत्या दाखवण्यात आली, असा दावा करतानाच खोट्या केसेस दाखल करण्यात येत असून राज्यात सध्या सुडाचं राजकारण सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला.

मुख्यमंत्र्यांनी वर्षपूर्ती निमित्त दिलेल्या मुलाखतीत हात धुवून मागे लागण्याचा इशारा दिला आहे. कुणाच्या विरोधात मागे लागणार हे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट करावं. जनतेच्या मागे हात धुवून लागण्यासाठी तुम्ही मुख्यमंत्री झाला आहात का? असा सवाल करतानाच हे पापी सरकार आहे, असा हल्लाही त्यांनी चढवला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER