सीझरची पत्नी आणि न्यायाधीशांचे चारित्र्य ( Caesar`s Wife and Judges` Charecter)

Court

न्यायाधीश पदावरील किंवा त्या पदासाठी इच्छुक असणाºया व्यक्तीचे चारित्र्य (Charecter) ज्युलियस सीझरच्या (Julius Caesar) पत्नीच्या चारित्र्याप्रमाणे, संशय घ्यायलाही जागा असणार नाही, एवढे निष्कलंक असायला हवे, ही बाब सर्वोच्च न्यायालायने एका ताज्या निकालाने पुन्हा एकदा अधोरिखित केली आहे. ज्युलियस सीझर हे विल्यम शेक्सपियरच्या त्याच नावाच्या गाजलेल्या नाटकातील मुख्य पात्र आहे. सीझरने त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेण्यावरून घडलेले नाट्य हे त्या  नाटकाचे कथानक आहे. आपल्याकडेची प्रभू रामचंद्रांनी वनवासातून अयोध्येला परत आल्यावर, लोकापवादाखातर सीतेला अग्निपरीक्षा द्यायला लावल्याची कथा रामायणात आहे.

सुप्रीम कोर्टाने ज्या प्रकरणात हा निकाल दिला त्याची तथ्ये पाहता या निकालात काही चूक आहे, असे म्हणता येणार नाही. मध्य प्रदेश सरकारने काही वर्षांपूर्वी जिल्हा न्यायाधीशांची (District Judges) पदे भरण्यासाठी अर्ज मागविले. अनिल भारद्वाज नावाचा उमेदवार लेखी परिक्षेत व नंतरच्या तोंडी मुलाखतीतही उत्तीर्ण झाला. त्याला निवड झाल्याचेही कळविण्यात आले. अर्ज केला, परीक्षा दिली व मुलाखत झाली त्या तिन्ही वेळेला भारव्दाज यांच्याविरुद्ध त्यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून दाखल झालेला हुंड्यासाठी झळ केल्याचा खटला (IPC S.498A) प्रलंबित होता. त्यांनी उमेदवारी अर्जात त्याची माहिती दिली होती. नंतर उच्च न्यायालच्या प्रशासकीय समितीने निवड झालेल्या उमेदवारांचा नियुक्तीसाठी फेरआढावा घेतला, तेव्हा भारव्दाज यांचे नाव, खटला प्रलंबित असण्याच्या कारणावरून निवड यादीतून वगळण्यात आले.

यानंतर वर्षभराने त्या प्रलंबित खटल्यात भारव्दाज निर्दोष मुक्त झाले. न्यायालयात त्यांचे म्हणणे असे होते की, आता मी निर्दोष मुक्त झालो आहे. त्यामुळे मला न्यायाधीश पदासाठी अपात्र मानण्याचे आता काहीच कारण नाही. आधी झालेल्या निवडीप्रमाणे आता मला त्या पदावर नेमण्यात यावे. परंतु न्यायालयाने घड्याळाचे काटे अशा प्रकारे उलटे फिरविण्यास नकार दिला.

या निकालावरून मुंबई उच्च न्यायालयात बर्‍याच वर्षांपूर्वी चाललेल्या एका प्रकरणाची आठवण झाली. ते प्रकरण प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व कनिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश (JMFC & CJJD)  या पदासंबंधीचे होते. त्यातही लेखी परीक्षा व तोंडी मुलाखतीनंतर रीतसर निवड झालेल्या मराठवाड्यातील एका यशस्वी उमेदवाराचे नाव उच्च न्यायालयाच्या प्रशासनाने नियुक्तीची आदेश काढण्याच्या अखेरच्या टप्प्यास निवड यादीतून वगळले होते.यासाठीही यशस्वी उमेदवारावरील फौजदारी खटल्याचे कारण दिले गेले होते.

परंतु आताचे मध्य प्रदेशातील प्रकरण  व ते महाराट्रातील प्रकरण यात मुलभूत फरक होता. झालेली निवड रद्द करण्यात आलेला त उमेदवार मराठवाड्यातील तालुक्याच्या शहरातील तीन पिढ्या वकिली चालत आलेल्या एका कुटुंबातील होता. त्याच्या कुटुंबाने त्यांचे जुने घर विकसित करून नवी इमारत बांघली. त्यातील एक व्यापारी गाळा स्वत:साठी ठेवला. त्या गाळयात  सायबर  कॅफे सुरु केले. ते चालविण्यासाठी एक पगारी कर्मचारी नेमला गेला. त्या सायबर कॅफेचे लायसेन्स या न्यायाधीश होऊ इच्छिणार्‍या तरुण वकिलाच्या नावावर होते. काही महिन्यांनी त्या सायबर कॅफेमध्ये ‘पॉर्नोग्राफिक साईट’ पैसे घेऊन बघू दिल्या जातात,अशा तक्रारीवरून पोलिसांनी धाड टाकली. तेथील कर्मचार्‍यास अटक झाली व लायसेन्स या तरुण वकिलाच्या नावावर होते म्हणून मालक या नात्याने त्याच्यावर खटला दाखल केला गेला. न्यायाधीशपदासाठी अर्ज केला तेव्हा या वकिलाने त्यात या प्रलंबित खटल्याचा उल्लेख केला. पुढे तोंडी मुलाखत होईपर्यंत त्या खटल्यातून त्याची निर्दोष मुक्तता झाली होती. मुलाखत घेणार्‍यांना त्याने तसे सांगितले व त्या निकालपत्राची प्रतही दिली. तरीही त्याची झालेली निवड रद्द केली गेली. त्याने याविरुद्ध याचिका केली तेव्हा उच्च न्यायालयाने निवड रद्द करण्याचे समर्थन अशाच प्रकारे ज्युलियस सीझरच्या पत्नीच्या नि:संशय चारित्र्याचा दाखला देऊन केले होते.

पण आपल्या उच्च न्यायालयाच्या त्या निकालात काही गोष्टी खटकण्यासारख्या होत्या. त्या उमेदवारावर अर्ज करताना खटला प्रलंबित होता तरी निवड होताना त्याची त्यातून निर्दोष मुक्तता झाली होती. दुसरे असे की, निवड करणार्‍या समितीत उच्च न्यायालयाचे एक न्यायाधीशही होते. उमेदवारीची खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्याने त्याची निवड त्यांच्या संमतीनेच झाली होती. तिसरे असे की, या उमेदवारास निर्दोष ठरविणार्‍या निकालाविरुद्ध सरकारने अपील केलेले नव्हते. त्यामुळे या उमेदवाराच्या चारित्र्यावर संशय घेण्यास जागा आहे, असे निदान सरकार तरी म्हणू शकत नव्हते. तरी त्या उमेदवारास रीतसर निवड होऊनही न्यायाधीशपद नाकारले गेले होते.

यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, न्यायाधीशपदी काम करत असलेल्यांच्या चारित्र्याविषयी शंका घेण्यासारख्या अनेक भल्याबुर्‍या गोष्टी कानावर येत असल्या, तरी मुळात या पदावर निवड करताना चारित्र्याच्या शुद्धतेचे, प्रसंगी अतिरेकी वाटावेत एवढे कठोर निकष लावले जातात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER