उद्धव ठाकरेंच्या आमदारकीचा मार्ग मोकळा; राज्यपाल नियुक्त आमदार करण्याची मंत्रिमंडळाने केली शिफारस

मुंबई :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राज्यपाल नियुक्त आमदार करा, अशी शिफारस मंत्रिमंडळाच्या आजच्या झालेल्या बैठकीतून करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आले. निवडणूक आयोगानं विधान परिषदेची निवडणुकही पुढे ढकलली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी लागते की, काय अशी चर्चा सुरू झाली होती. त्यावर आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तोडगा काढण्यात आला. उद्धव ठाकरे यांना राज्यपालांच्या कोट्यातून विधान परिषदेत पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात राज्यपालांकडे शिफारस करण्यात येणार आहे.विधान परिषद निवडणूक लांबणीवर पडली असली, तरी उद्धव ठाकरे यांचा विधिमंडळात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यात उद्भवलेल्या करोनाच्या संकटाबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमदार होणं आवश्यक होतं. गुरूवारी (९ एप्रिल) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याविषयावर चर्चा झाली. विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या कोट्यातून उद्धव ठाकरे यांना विधिमंडळाचं सदस्यत्व देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात लवकरच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे शिफारस केली जाणार आहे.