शरद पवारांचा लाडका म्हणून या नेत्याची टिंगलटवाळी करतात; पण ”जनसेवेचे वेड असलेला वेडा आमदार”..!

Jitendra Awhad

मुंबई : देश कोरोना सारख्या महाभयंकर आजाराच्या विळख्यात सापडला आहे. एवढा भयंकर हा आजार आहे की कधी नव्हे ते इतिहासात पहिल्यांदा संपुर्ण जगबंदी करावी लागली आहे. काही मोजके देश सोडले तर सध्या संपु्र्ण जग लॉकडाऊन झाले आहे. प्रत्येकजण आपल्या आपल्या घरात लॉकडाऊन झाला आहे.

लॉकडाऊन संपेपर्यंत गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड करणार एक लाख फूड पॅकेट्सचे वाटप

या देशव्यापी बंदमुळे रस्तावर राहणा-या, तसेच, मोलमजुरी करून हातावर आणून पानावर खाणा-या लोकांचे जगणे मात्र कठीण झाले आहे. संपुर्ण देशभरात ही स्थिती आहे. मुंबईत तर हजारो लोक रस्त्यावरच आपला संसार थाटून राहत असतात. तेथे तर हाल न पाहवणारेच आहे मात्र, अशा लोकांसाठी पुन्हा एकदा कॅबीनेट मंत्री, आमदार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड नेहमीप्रमाणे रस्त्यावर उतरून आपले जनसेवेचे काम करताना दिसत आहेत.

एक दिवस किंवा दाखवण्यापुरतं नाही तर रोजच आव्हाड या लोकांना अन्न, पाणी, फळांचे वाटप करत आहेत. फेसबूकवरून एका व्हिडिओच्या माध्यमातून ज्येष्ठ पत्रकार रविंद्र पोखरकर यांनी ही माहिती दिली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ज्येष्ठ पत्रकार रविंद्र पोखरकर यांची फोसबूक पोस्ट –

फेसबुकवर वगैरे काही लोक या नेत्याची अनेकदा टिंगलटवाळी उडवताना दिसतात.अनेकांना तो कसा काय बुवा तीनतीन वेळा सलग मोठ्या मताधिक्याने निवडून येतो याचं आश्चर्य वाटतं.कोणताही भेदभाव न करता तो सर्वधर्मियांसाठी समान काम करीत असला तरी त्याला जितुद्दीन,जितुखान वगैरे वगैरे विशेषणं लावून त्याची हेटाळणी केली जाते.का ते शरद पवार त्याला एवढं महत्व देतात,महत्वाच्या खात्याचा मंत्री करतात याचीही अनेकांना पोटदुखी असते..

पण अशा सगळ्यांना हे दिसत नाही कि रस्त्यावरच्या प्रत्येक लढाईत हा माणूस सर्वात प्रथम सामान्य माणसासाठी आणि त्याच्या अधिकारासाठी धावून जात असतो.प्रश्न कुणाच्या पोटाचा असो किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा..प्रश्न धार्मिक झुंडशाहीचा असो किंवा मग आत्ताच्या कोरोनासारख्या महा आपत्तीचा..हा माणूस स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरलेला असतो.

आज अन्य बहुसंख्य राजकारणी,नेते हातावर पोट असलेल्या आणि रस्त्यावरच्या बहुसंख्य गरिबांना वाऱ्यावर सोडून स्वतःच्या जीवाची काळजी घेत घरी बसलेले असताना हा कॅबिनेट मंत्री मात्र रस्त्यावर उतरून त्यांना अन्न-पाणी वाटत फिरतोय.आणि हे केवळ एक दिवस किंवा दाखवण्यापुरतं नाही तर रोज..

त्यांच्या याच स्वभावामुळे पूर्वी मी त्यांना एकदा वेडा आमदार म्हटलेलं..! हो..जनसेवेचे प्रामाणिक वेड असलेला वेडा आमदार..!