मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा आत्महत्या करणार; धर्मा पाटलांच्या मुलाचा इशारा

dharma_patil

धुळे :- भूसंपादनात गेलेल्या फळबागेच्या जमिनीचा मोबदला न मिळाल्याने मंत्रालयात २२ जानेवारीला विष प्राशन करून आत्महत्या करणारे शेतकरी धर्मा मंगा पाटील यांच्या मुलाने आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. माझ्या कुटुंबियांना योग्य न्याय न मिळाल्याने आणि दोषींवर अद्यापपर्यंत कारवाई न झाल्याने मुख्यमंत्र्यांसह तीन मंत्र्यांनी राजीनामा न दिल्यास आत्महत्या करणार असल्याचा इशारा धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र धर्मा पाटील यांनी दिला आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांनाच ई-मेल द्वारे पत्र पाठवून हा इशारा दिला आहे.

धर्मा पाटील यांच्या आत्महत्येस एक वर्षाचा कालावधी होत आला आहे. या प्रकरणी अद्यापपर्यंत दोषींवर कारवाई झाली नाही. दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन देणारे आणि या प्रकरणात मध्यस्थी करणारे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, रोहयो, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे अपयशी ठरले आहेत. याची जबाबदारी घेऊन या मंत्र्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी नरेंद्र पाटील यांनी केली आहे. हे मंत्री जर स्वतःची नैतिक जबाबदारी स्वीकारण्यास असमर्थता दर्शवत असतील तर आपण या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, असे पत्र ई-मेलद्वारे धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र धर्मा पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे.

मागणीकडे तात्काळ लक्ष देऊन कारवाई न झाल्यास माझ्याकडे आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही. याची सर्वस्वी जबादारी मुख्यमंत्री यांची राहील, नरेंद्र पाटील यांनी मेलद्वारे पाठवलेल्या पत्रात नमूद केलं आहे.

विखरण परिसरात (ता. शिंदखेडा, जि. धुळे) प्रस्तावित औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पात शेतकरी धर्मा पाटील, नरेंद्र धर्मा पाटील यांची चार एकर शेती बाधित झाली. त्यांना चार लाखांचा मोबदला मिळाला. मात्र, लगतच्या शेतकऱ्याचे क्षेत्र ७४ आर. असताना त्याला एक कोटी ८९ लाखांचा मोबदला दिला गेला. सरकारी यंत्रणेने असा दुजाभाव का केला? मला अत्यल्प लाभ देण्याचे कारण काय? शेतात सहाशे आंब्यांची झाडे असताना मूल्यांकनात का दर्शविण्यात आली नाहीत, असे काही गंभीर प्रश्‍न उपस्थित करत पाटील पिता- पुत्र तीन वर्षांपासून शासन, प्रशासनाशी भांडत होते. न्याय मिळत नसल्याने शेतकरी धर्मा पाटील यांनी २२ जानेवारीला मंत्रालयात विष प्राशन करत आत्महत्या केली होती.