कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘दिवे’ लावून आपल्याला एकजुटीचा संदेश द्यायचा – हर्षवर्धन पाटील

PM Modi-Patil

मुंबई : कोरोनामुळे पसरलेला अंधकार दूर करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. त्यामुळेच आपण सर्वांनी रविवारी रात्री ९ वाजता घरातील सगळे लाइट्स बंद करून दारात किंवा बालकनीमध्ये एक दिवा, मेणबत्ती, बॅटरी किंवा मोबाईल फ्लॅश लाईट लावावेत, असे आवाहन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशातील जनतेला संबोधित केले.

मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार जनतेने घरोघरी रविवारी रात्री नऊ वाजता वीज बंद करून मेणबत्ती, दिवा, टॉर्च किंवा मोबाईलची फ्लॅश लाईट चालू करून जगाला एकजुटीचा संदेश द्यावा, असे आवाहन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे.

दरम्यान, पंतप्रधानांच्या या आवाहनाबाबत राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत बोलताना फडणवीस यांनी, ‘रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी लाईट बंद करून मेणबत्ती, दिवा अथवा मोबाईल फ्लॅशच्या उजेडात आपल्याला भारताच्या कोरोनाविरोधातील लढ्याला चिन्हांकित करायचे आहे. जनतेने पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा.’ असे मत नोंदवले .