…पण अश्या घटनांमधून बोध घ्यायचाच नाही असं नाही, विरार घटनेवरुन राज ठाकरे सरकारवर गर्जले

Maharashtra Today

मुंबई : आज पहाटे विरार पश्चिम येथील विजय वल्लभ कोविड रुग्णालयातील (Fire-at-virar-vijay-vallabh-hospital)आयसीयू कक्षाला लागलेल्या आगीत १३ कोरोनाबाधित रुग्णांच्या होरपळून मृत्यू झाला. या घटनेवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी शोक व्यक्त करत सरकारला काही संतप्त सवाल करून सूचनाही केल्या आहेत.

राज ठाकरे यांनी ट्विट करून विरारमधील घटनेवर तीव्र शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत. आज विरार मधल्या हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. परवा नाशिकमधली घटना असो की काही दिवसांपूर्वीची भंडारा आणि भांडूपमधील घटना असोत, या घटना दुर्दैवी आणि क्लेशदायी आहेत, असं सांगतानाच सध्याच्या परिस्थितीत सरकारी यंत्रणांवर ताण आहे हे मान्य. पण म्हणून या घटनांमधून काही बोध घ्यायचाच नाही असं नाही. सरकारने तातडीने जबाबदार अधिकाऱ्यांच्या टीम्स तयार करून, प्रत्येक रुग्णालयातील व्यवस्थांच, अग्निसुरक्षा यंत्रणांचं तात्काळ ऑडिट करून घ्यायला हवं. आणि ज्या त्रुटी आढळतील त्यावर उपाययोजना केल्या पाहिजेत, अशा सूचनाही राज यांनी केल्या आहेत.

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांनीही विरारच्या घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. राज्यात उद्भवलेल्या संकटाशी डॉक्टर, नर्सेस, शासकीय व खाजगी आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर लढत असताना नाशिक किंवा विरारसारख्या दुर्घटना घडून रुग्णांना जीव गमवावा लागणे अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक आहे, असे सांगत अजित पवार यांनी विरारच्या विजय वल्लभ रुग्णालयाला लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांना श्रद्धांजली वाहिली. मृत रुग्णांच्या नातेवाईकांबद्दल त्यांनी सहसंवेदनाही व्यक्त केल्या. अजित पवार यांनी पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून दुर्घटनेची माहिती घेतली असून अन्य रुग्णांची सुरक्षितता व त्यांच्यावरील उपचार सुरळीत सुरु राहतील, याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत. रुग्णालयांची सुरक्षितता, फायर ऑडीट करण्याचे निर्देश देऊनही अशा घटना सतत घडत आहेत. राज्यात आणि देशातही अशा घटना वाढल्या आहेत. यामागची कारणे उच्चस्तरीय समितीकडून शोधून चुका कायमस्वरुपी दूर करण्याची बाब गांभीर्याने घेतली जाईल. मुख्यमंत्री महोदयांनी या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून त्यातून तथ्य बाहेर येईल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button