शेअर बाजार गडगडला, ७५० अंकांची घसरण

मुंबई : आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात (stock market) मोठी पडझड झाली. विक्रीच्या दबावाने मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ७५० अंकांनी गडगडला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २४३ अंकांनी घसरला आहे. या पडझडीत गुंतवणूकदारांचे सुमारे दोन लाख कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

आज सकाळपासून बाजारात नकारात्मक वातावरण होते. शुक्रवारी अमेरिकन शेअर बाजार घसरला होता. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षांची निवडणूक, करोनाचे नुकसान याचे पडसाद भांडवली बाजारावर उमटले. सिंगापूरसह जगातील प्रमुख शेअर बाजारांत आज घसरण झाली. त्याचा परिणाम भारतीय बाजारात झाला. गुंतवणूकदारांनी विक्रीचा मारा सुरू केला. सध्या सेन्सेक्स ७४३ अंकांनी कोसळला असून ३८१०२ अंकांवर ‘ट्रेंड’ करत आहे. निफ्टी २४३ अंकांनी घसरला असून ११२६१ अंकावर आहे.

संसदेत कृषी विधेयकावरून मोठा गोंधळ उडाला आहे. केंद्र सरकारवर जोरदार टीका होते आहे. एकीकडे करोनाशी लढाई सुरु असताना कृषी विषेयकावरून सुरु असलेल्या गोंधळाने बाजारात अस्थिरता निर्माण झाली. गुंतवणूकदारांनी या पैसे काढून घेण्याला सुरुवात केली.

आजच्या सत्रात टेलिकॉम, बँका, वित्त संस्था, वाहन उद्योग या क्षेत्रात विक्रीचा जोर होता. आयटी आणि हॉटेल कंपन्यांच्या शेअरला मात्र खरेदीदर होते.

सेन्सेक्सच्या तालिकेवरील ३० पैकी २७ शेअर घसरणीने बंद झाले. इन्फोसिस, कोटक महिंद्रा बँक आणि टीसीएसच्या शेअरमध्ये वाढ झाली. वित्त सेवा क्षेत्रात एडलवाइज फायनान्शिअल, इंडियाबुल्स हाऊसिंग, मुथूट फायनान्स, श्रीराम सिटी युनियन, आदित्य बिर्ला कॅपिटल, हुडको असे महत्वाचे शेअर घसरले आहेत. आजच्या पडझडीत स्थावर मालमत्ता क्षेत्रातील कंपन्यांना देखील दणका बसला आहे.

रिझर्व्ह बँकेच्या अहवालात बँकांमधील आर्थिक फसवणुकीच्या घटना वाढल्यानंतर आज बँकांच्या शेअरची गुंतवणूकदारांनी जोरदार विक्री केली. यात एसबीआय, बँक ऑफ बडोदा, पीएनबी, युनियन बँक, बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, युको बँक, बँक ऑफ महाराष्ट्र आदी शेअर घसरले. चलन बाजारात आज डॉलरच्या तुलनेत रुपया ७ पैशांनी वधारून ७३.३८ वर बंद झाला. शुक्रवारीही तो ७ पैशांनी वधारला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER