इमेल हॅक करुन व्यावसायिकाची फसवणूक

email hack

मुंबई : अ‍ॅक्वेरीयम उत्पादने विक्रीचा व्यवसाय करणार्‍या एका व्यावसायिकाचा इमेल आयडी हॅक करुन ठगाने बनावट मेल पाठवत त्यांच्याकडून साडे दहा लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी फसवणूकीचा गुन्हा दाखल करुन बोरीवली पोलीस तपास करत आहेत.

बोरीवली पश्‍चिमेकडील चिकूवाडी परिसरात राहात असलेल्या 41 वर्षीय मांजरावाला यांचा विदेशातून अ‍ॅक्वेरीयम उत्पादने मागवून ती देशात विविध ठिकाणी विक्रीचा व्यवसाय आहे. इमेल आणि ऑनलाईन आर्थिक देवाण-घेवाणीतून त्यांचे सर्व व्यवहार चालतात. इटली देशातील एका कंपनीकडून ते गेल्या काही वर्षांपासून नेहमी उत्पादने मागवत आहेत. नेहमी प्रमाणे मांजरावाला यांनी जुलै महिन्यात या कंपनीकडून काही उत्पादने मागविली. कंपनीने मांजरावाला यांच्याकडे कागदपत्रांची मागणी करत उत्पादनांची रक्कम भरण्यास सांगितले गेले.

नेहमी कंपनीच्या सांगण्यावरुन मांजरावाला हे रक्कम कंपनीच्या इटली येथील बँक खात्यात रक्कम भरत होते. मात्र यावेळी मेलमध्ये स्पेन देशातील बँकेत रक्कम पाठविण्याबाबत नमूद करण्यात आले होते. त्याच्यावर विश्वास ठेवून 26 जुलैला मांजरावाला यांनी सांगितलेल्या खात्यात 10 लाख 49 हजार 841 रुपये भरले. बँक खात्याच्या नावामध्ये तफावत असल्याने 5 ऑगस्टला ही रक्कम खात्यात पून्हा परत आली. त्यामूळे मांजरावाला यांनी कंपनीच्या एक्सपोर्ट विभागाच्या प्रमुखांना इमेलच्या माध्यमातून विचारणा केली.

मांजरावाला यांना पून्हा मेल आला यावेळी पोलंड देशातील बँक खात्यात रक्कम पाठविण्यास सांगण्यात आले. त्यानुसार 7 जुलैला मांजरावाला यांनी रक्कम त्या खात्यात वळती केली. रक्कम मिळाल्याबाबत विचारणा करण्यासाठी मांजरावाला यांनी पाच ते सहा मेल केले. मात्र रिप्लाय न आल्याने अखेर त्यांनी कंपनीच्या सेल्स मॅनेजरला कॉल करुन विचारणा केली असता रक्कम मिळाली नाही. आपल्या कंपनीचे इटली व्यतिरीक्त कोठेही बँक खाते नसल्याचे त्याने सांगितल्याने मांजरावाला यांना धक्का बसला.

इमेल आयडी हॅक करुन ही फसवणूक करण्यात आली होती. याची माहिती मिळताच मांजरावाला यांनी बोरीवली पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.