शेतीवरचा भार कमी झाला पाहिजे – पवार

Sharad Pawar

मुंबई : ‘कुटुंबातील एकानेच शेती करावी. शेतीवर कुटुंब चालवणं आता कमी व्हायला हवं. शेतीवरचं ओझं कमी करण्याची गरज आहे. देशातील बहुसंख्य लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. शेतीवर अवलंबून राहणं कमी केलं पाहिजे.’ असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात केले. ते म्हणाले की, इतर क्षेत्रांमध्ये रोजगार निर्मितीबाबत विचार करावा लागेल. ५१ टक्के शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरपेक्षा कमी शेती आहे. दोन हेक्टरपेक्षा कमी शेतीवर कुटुंबातील पाच माणसं अवलंबून आहेत. देशपातळीवर ५८ ते ६० टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत.

शेतीत पाणी ही मोठी समस्या आहे. भारतात ४५ टक्के शेती ही सिंचनावर केली जाते. सर्वांत जास्त पाण्याचे साठे आणि धरणं महाराष्ट्रात आहेत. पंजाबमध्ये गहू आणि तांदूळ ही पिकं उत्तमरीत्या घेतली जातात. उत्तरप्रदेश आणि हरियाणातही तीच गोष्ट आहे. दक्षिणेकडेही भाताची दोन ते तीन पिकं घेतली जातात. आपली स्थिती तशी नाही. अन्नधान्य ही देशाची गरज आहे त्याबद्दल वाद नाही.

अन्न-धान्य उत्पन्नासाठी महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब की उत्तरप्रदेश कोणती राज्यं योग्य आहेत, याचा विचार व्हावा. उपलब्ध पाण्याचं योग्य नियोजन करणं आवश्यक आहे. ठिबक सिंचनामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक पहिला लागतो. महाराष्ट्रात उसाचे उत्पादन, त्यापासून साखरेचं उत्पादन हा एक महत्त्वाचा व्यवसाय झाला आहे. उसापासून ज्युस आणि अन्यपदार्थही तयार करता येतात. साखर उत्पादनात राज्य दुसऱ्या स्थानी आहे. राज्यात कापसावर आधारित उत्पादनांमध्ये वाढ झाली आहे, असे पवार म्हणाले.