मंत्र्यांचे बंगले, पुरवणी मागण्या फडणवीसांचा संताप अन् मुनगंटीवारांची आक्रमकता

Nana Patole & Sudhri Mungantiwar & Devendra fadnavis

मुंबई : विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या अधिवेशनाची सुरुवात सोमवारी काहीशी वादळी झाली. केवळ दोन दिवसांचे अधिवेशन घेतले जात असल्याबद्दल भाजपचे ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी सभागृहाचे कामकाज सुरू होताच तीव्र नाराजी व्यक्त केली. आश्चर्याची बाब म्हणजे खुद्द विधानसभा अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी या नाराजीच्या सुरात सूर मिसळला.

केवळ दोन दिवसांचे अधिवेशन घेणे योग्य नाही. सरकार आणि विरोधी पक्षांनी एकत्र बसून किमान पुढचे अधिवेशन तरी पूर्णकाळ चालेल याची काळजी घ्यावी या शब्दात त्यांनी कानउघाडणी केली. विधिमंडळाचे कामकाज चालविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विधिमंडळ समित्यांच्या बैठकीच होत नसल्याची बाब मुनगंटीवार यांनी आक्रमकपणे मांडली. लोकशाही बेशुद्ध पडली आहे असे ते म्हणाले. त्यावर सांसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी, लोकशाही बेशुद्ध पडायची नसेल तर राज्यपालांना १२ सदस्यांची विधान परिषदेवर नियुक्ती करायला सांगा असा टोला मुनगंटीवार यांना हाणला. यावर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तीव्र हरकत घेतली. मात्र, अध्यक्ष पटोले यांनी हा वाद वाढू दिला नाही.

मंत्र्यांचे बंगले आणि दालनांवर तब्बल ९० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असल्याच्या बातमीने सोमवारी बरेच आरोप-प्रत्यारोप झाले. ‘मी माहिती घेतली, हा ९० कोटींचा आकडा बरोबर नाही असा बचाव उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहाबाहेर पत्रकारांशी बोलताना केला. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनीही बचाव केला. हे बंगले मंत्र्यांच्या मालकीचे नाहीत. शिवाय ते जुने आहेत आणि त्यांची दुरुस्ती ही करावीच लागली असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले.सरकार कंत्राटदारधार्जिणे असून कोरोनाकाळात मंत्र्यांच्या बंगल्यांवर एवढा खर्च करण्याची गरज काय असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरकेर यांनी केला.

शेतकरी आंदोलनाचे पडसाद विधानभवनातही उमटले. केंद्र सरकारचे शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी आणि देशव्यापी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा क्षेत्राचे आमदार  विनोद निकोले, शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील, शेकापचे बाळाराम पाटील व श्यामसुंदर शिंदे, बहुजन विकास आघाडीचे  राजेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे  सुनील भुसारा, समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी व आमदार रईस शेख यांनी विधान भवनात बॅनर झळकवत निषेध व्यक्त केला.

बडनेरा; जि.अमरावतीचे आमदार रवि राणा हे शेतकऱ्यांवरील अन्यायाच्या निषेधार्थ घोषणा लिहिलेला कुर्ता घालून सभागृहात आले होते. त्यावरून काही वेळ गोंधळ झाला.ते वेलमध्येही उतरले. रवि राणा यांना सभागृहातून बाहेर हाकलण्याची मागणी सत्ताधारी सदस्यांनी केली. अध्यक्ष नाना पटोले यांनी तसे निर्देशही दिले. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रवि राणा यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केले म्हणून त्यांना ऐन दिवाळीत तुरुंगात डांबण्यात आले असे सांगून सरकारविरोधात बोलणाऱ्या,आंदोलन करणाऱ्यांचे अटकसत्र सुरू आहे, मराठा आंदोलकांना तर घरात घुसून पकडले जात आहे असा आरोप केला. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, मराठा आरक्षणाबाबत सरकारचे अपयश या विरुद्ध भाजपच्या सदस्यांनी विधानभवनाच्या पायºयांवर बसून घोषणाबाजी केली.

पुरवणी मागण्या म्हणजे आजकाल मिनीबजेटच बनल्या आहेत. सोमवारी तब्बल २१ हजार ९९२ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या वित्त मंत्री अजित पवार यांनी सादर केल्या. तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांच्या खात्यांना निधी देण्यात आला असला तरी राष्ट्रवादीकडील खात्यांना झुकते माप दिल्याचे आकडेवारीवरून दिसते. ओबीसी समाजासाठी असलेल्या महाज्योती या संस्थेला ८१ कोटी रुपये देऊन समाधान करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, या संस्थेला पुरवणी मागण्यांमध्ये १५० कोटी रुपये दिले जातील, असे आश्वासन आठ दिवसांपूर्वी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दिल्याच्या बातम्या छापून आल्या होत्या.

विद्यमान आमदार पंढरपूरचे भारतनाना भालके, माजी मंत्री विष्णू सावरांसह दिवंगत आजीमाजी सदस्यांना विधिमंडळात श्रद्धांजली वाहण्यात आली. सभागृहाने संमत केलेल्या प्रस्तावाची प्रत या सदस्यांच्या घरी पोहोचविली जाते. वर्षानुवर्षे हीच पद्धत आहे. मात्र या पुढे त्या सदस्यांच्या कार्याचा उल्लेख असलेले मानपत्र त्यांच्या घरी पोहोचविले जाईल, असे सांगत अध्यक्ष नाना पटोले यांनी नवा पायंडा पाडला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER