बुलेट ट्रेनचा विरोध थंडावला?

ठाणे : मुंबईमध्ये बुलेट ट्रेनची एक वीटही रचू दिली जाणार नाही… …बुलेट ट्रेन म्हणजे बिनकामाचा नागोबा आहे… …बुलेट ट्रेन ही सामान्यांच्या फायद्याची नाही…… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या प्रस्तावाला विरोध करतांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अशा गर्जना केल्या होत्या. मात्र, बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू झाल्यानंतरही हे दोन्ही पक्ष शांत आहेत.

बुलेट ट्रेनसाठी जमीन गमावणाऱ्या स्थानिकांनी सुरू केलेल्या संघर्षाला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. मात्र, शिवसेना आणि मनसेचे स्थानिक नेते गायब आहेत.

जपानच्या अर्थसहाय्याने मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या उभारणीची तयारी मोदी सरकारकडून सुरू झाल्यानंतर शिवसेना आणि मनसेकडून विरोधाची धार वाढवण्यात आली होती. ज्यांच्या जमिनी या प्रकल्पात जाणार आहेत त्यांना शासनाकडून नोटीसा मिळू लागल्या असून त्यांचा विरोध वाढू लागला आहे.

या शेतकऱ्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे कळव्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची भेट घेऊन या प्रकल्पाच्या विरोधात मदतीची याचना केली आहे. त्यानंतर शेतकऱ्यांच्या समाधानाशिवाय बुलेट ट्रेनचे भूसंपादन होणार नाही, असे स्पष्ट संकेत आव्हाड यांनी दिले आहेत. ठाण्यातील दिवा, म्हातार्डी, आगासन, दातिवली या भागातील शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला होता.