‘धाकड’मध्ये कंगनासाठी अ‌ॅक्शन करणार बुल्गारियाची स्टंट वुमन

कंगना रनौत (Kangana Ranaut) सध्या तिच्या नव्या ‘धाकड’ (Dhakad) सिनेमाच्या प्रमोशनमध्ये प्रचंड व्यस्त झाली आहे. या सिनेमाच्या घोषणेपासून तिने या सिनेमाबाबत उत्सुकता निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. कंगनाचा हा सिनेमा अॅक्शनने भरलेला असून तो एखाद्या हॉलिवुडपटाप्रमाणे तयार केला जाणार आहे. या सिनेमाचे पोस्टर बघताच यात काय असेल आणि कंगनाने काय भूमिका साकारली असेल याची कल्पना येते. स्वतः कंगनानेही या सिनेमातील तिचे स्टंट तोंडात बोट घालायला लावणारी असतील असे म्हटले होते. एवढेच नव्हे तर कंगनाने या सिनेमातील स्टंट स्वतः करणार असल्याचेही म्हटले होते. परंतु निर्माते कंगनाबाबत कोणताही धोका पत्करायला तयार नाहीत त्यामुळेच या सिनेमातील काही अत्यंत धोकादायक दृश्ये कंगनाकडून करवून न घेता तिच्या बॉडी डबलकडून करवून घेतली जाणार आहेत.

कंगनाने काही दिवसांपूर्वीच तामिळनाडूच्या मुख्यमंत्री स्वर्गीय जयललिता यांच्या जीवनावरील ‘थलाइवी’ सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले आहे. हा सिनेमा हिंदी, तामिळ आणि तेलुगू अशा तीन भाषांमध्ये रिलीज केला जाणार आहे. या सिनेमात कंगनासोबत अरविंद स्वामी, प्रकाश राज, जिशु सेनगुप्ता, मधु, भाग्यश्री यांच्याही भूमिकाही आहेत. या सिनेमानंतर कंगनाने धाकडचे शूटिंग सुरु केले आहे. या सिनेमात एका महिला गुप्तहेराची भूमिका साकारत आहे. त्यासाठी तिला अत्यंत धोकादायक स्टंट करावे लागणार आहेत. सूत्रांनी सांगितले, कंगना स्वतः स्टंट करु इच्छित होती पण निर्मात्यांनी तिला असे करू देण्यास नकार दिला आहे. मणिकर्णिका सिनेमाच्या वेळी कंगनाने स्वतः स्टंट केले होते आणि ती अनेकदा जखमीही झाली होती. जर कंगनाला या सिनेमात स्टंट करताना काही झाले तर सिनेमाला उशिर होईल आणि ते परवडणार नाही. त्यापेक्षा धोकादायक स्टंट बॉडी डबलकडून करून घेऊया असे निर्मात्याने कंगनानाला सांगितले. कंगना यासाठी तयार झाल्यानंतर तिच्यासारखी शरीरयष्टी असणाऱ्या स्टंट वुमनचा शोध सुरु करण्यात आला होता. हा शोध बुल्गारियात जाऊन संपला. बुल्गारियातील एक स्टंट वुमनची शरीरयष्टी कंगनाच्या शरीरयष्टीबरोबर जुळत असल्याचे दिसताच तिला ताबडतोब भारतात बोलावण्यात आले. ही स्टंट वुमन भारतात आल्यानंतर तिला काही दिवस क्वारंटाईनही करण्यात आले. त्यानंतरच तिला सेटवर येऊ दिले गेले आणि तिने काम सुरु केले.

कंगनाच्या ‘धाकड’चे मध्यप्रदेशमध्ये शूटिंग सुरु झाले आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन रजनीश घई करीत असून यात कंगनासोबत अर्जुन रामपाल आणि दिव्या दत्ता यांच्याही मुख्य भूमिका आहेत. गांधी जयंतीच्या निमित्ताने म्हणजे 1 ऑक्टोबर 2021 ला कंगना तिचा हा सिनेमा रिलीज करणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER