अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिलाच दिवस अवघ्या १३ मिनिटांत गुंडाळला

Legislative Council-maharashtra

मुंबई :- शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिल्या दिवस चांगलाच गाजला. केवळ १३व्या मिनिटाला विधान परिषदेत दिवसभराचे कामकाज उरकण्यात आले. शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या घटनांच्या मुद्द्यांवर विरोधकांचा स्थगन प्रस्ताव सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी फेटाळून लावला. त्यामुळे संतप्त झालेल्या विरोधकांनी सभापतींसमोरील मोकळ्या जागेत उतरून घोषणाबाजीला सुरुवात केली.

मात्र, या गदारोळातच सभापतींनी पुढील कामकाज पुकारले. विरोधकांच्या गदारोळात अवघ्या १३ व्या मिनिटाला दिवसभराचे कामकाज उरकले गेले.

दुपारी १२ वाजता ‘वंदे मातरम्’ ने विधान परिषदेच्या कामकाजाला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी विरोधकांनी स्थगन प्रस्ताव मांडण्याची सूचना दिली होती. महिला अत्याचार आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदतीच्या मागणीसाठी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी स्थगन मांडण्याचा प्रयत्न केला. यावर, शिवसेना सदस्य दिवाकर रावते यांनी आक्षेप घेतला. विधान परिषद हे स्थायी सभागृह आहे. यापूर्वी सभापती शिवाजीराव देशमुख यांनी प्रश्नोत्तराच्या तासानंतरच स्थगन प्रस्ताव घेण्याचा निर्णय दिला होता. त्यामुळे प्रश्नोत्तराच्या तासानंतरच स्थगनच्या सूचना घ्याव्यात अशी मागणी केली. तर, गेली पाच वर्षे आम्हीसुद्धा हीच मागणी करत होतो.

मात्र, एका स्थगनवर चारचार सदस्य भाषणे ठोकत होते. त्या पाच वर्षांत शिवाजीराव देशमुख यांच्या आदेशाचे पालन झालेले नाही. आता हीच नवी प्रथा बनली आहे. आम्ही विरोधात आलो  म्हणून लगेच प्रथा बदलू नये, अशी मागणी भाजप सदस्य भाई गिरकर यांनी केली. यावर अनेक आदेशांचे पालन झाल्याचे सभापतींनी स्पष्ट केले. काही बाबी होऊ शकल्या नसतील तर त्या तशाच चालू ठेवता येणार नाहीत, अशी भूमिका मांडत सभापतींनी स्थगन प्रस्तावाच्या सूचना फेटाळून लावल्या.

यावर संतप्त झालेल्या विरोधकांनी जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केली. या गदारोळातच २०१९-२० च्या पुरवणी मागण्या आणि इतर कागदपत्रे  सभागृहासमोर ठेवण्यात आली. विरोधकांच्या गदारोळातच कार्यक्रम पत्रिकेवरील सर्व कामकाज पुकारले गेले. अवघ्या १३ व्या मिनिटाला सर्व नियोजित कामकाज गदारोळात पूर्ण झाले आणि सभापतींनी दिवसभराचे कामकाज तहकूब करण्याची घोषणा केली.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी फडणवीस आक्रमक; सभागृहात भाजपा आमदारांची घोषणाबाजी


Web Title : Budget session work ends first 13 minutes first day

Maharashtra Today : Online Marathi News Portal