अर्थसंकल्पीय अधिवेशन : पहिल्या आठवड्यात विरोधक भारी, गृहखात्याची फरफट

Devendra Fadnavis - Ajit Pawar - Uddhav Thackeray

मुंबई : कोरोनाच्या (Corona) साथीमुळे होणाऱ्या १० दिवसांच्या अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात आघाडीतील पक्षांच्या समन्वयाभावी विरोधकांनी सरकारची कोंडी केली. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरात प्रशासकीय बाबींवर समाधानकारक खुलासा नसल्याने त्याचा प्रभाव पडला नाही. विधिमंळातले भाषण म्हणजे पक्षाच्या सभेचे भाषण नाही, असे म्हणून विरोधकांनी खिल्ली उडवली.

पहिल्या दिवशी वीज देयकांच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक झाले. विधानभवना बाहेर आणि सभागृहात आंदोलन केले. कामकाज सुरू होताच हा प्रश्न मांडला. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी, या प्रश्नावर चर्चा होत नाही तोपर्यंत वीज कनेक्शन न तोडण्याचा निर्णयाची घोषणा केली. सरकारला नमते घ्यावे लागले. विरोधकांना बळ मिळाले.

त्यानंतर राज्यपालांच्या अभिभाषणावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी राज्यपालांना विमानातून उतरवणे ते कोरोना काळातील भ्रष्टाचार, संजय राठोड (Sanjay Rathod), मुंबईतील मेट्रो सारखे प्रकल्प, आरे कार शेड, कोरोना असून मुंबईत सुरू असलेले पब, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अशा विविध विषयांवर तीव्र हल्ला केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या भाषणाकडे सगळ्यांचे लक्ष होते. मात्र, त्यांनी हिंदुत्व, दिल्लीतील शेतकरी आंदोलन, पेट्रोल (Petrol) डिझेल (Diesel) दरवाढ या मुद्द्यांवरून भाजपावर (BJP) टीका केली. प्रशासकीय बाबींवर अपेक्षित उत्तरे दिली नाहीत त्यामुळे सरकारची बाजू ढेपाळली.

सरकारमधील पक्षांच्या समन्वयाचा अभाव

पुरवणी मागण्या असो किंवा राज्यातील कायदा सुव्यवस्था यावर विरोधी पक्षातील आमदारांच्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवार एकटे तोंड देत होते. राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसचे (Congress) काही मंत्री आजारी याचा फटका या अधिवेशनात बसला. ‘फ्लोअर मॅनेजमेंट’मध्ये सरकार कमी पडले दिसले. काही वेळा तर ज्या विभागावर चर्चा सुरू आहे त्याचे मंत्री उपस्थित नसल्याची टीका विरोधकांनी केली. मंत्री सभागृहात उपस्थित नाही हे विरोधकांनी वारंवार लक्षात आणून दिले.

मनसुख हिरेन प्रकरणाने कोंडी

उद्योजक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर आढळलेल्या संशयित गाडीबाबत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात माहिती दिली. गाडीचा मालक मनसुख हिरेन याला सुरक्षा देण्याची मागणी केली. देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख आणि पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे संबंध, त्यांचे फोन रेकॉर्ड याची माहिती सभागृहात मांडली. यानंतर काही मिनिटाच मनसुखचे शव खाडीत सापडले. यामुळे सरकारची मोठी कोंडी झाली. या प्रकरणाला वेगळे वळण लागले. विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला.

गृहखात्याची फरफट

अधिवेशन काळात जळगाव वसतिगृहातील महिलांचे प्रकरण समोर आले पण सरकारच्या सुदैवाने त्यातील सत्य वेगळेच सरकारला दिलासा मिळाला. मात्र, अंबानीच्या घराबाहेर सापडलेल्या गाडीच्या मालकाचे शव सापडले आणि त्याची माहिती गृह खात्याला नव्हती! विरोधी पक्षनेते इतकी माहिती देतात पण गृहखाते अंधारात असे चित्र निर्माण झाले. गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि अनिल परब (Anil Parab) यांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला पण त्याला अर्थ नव्हता.

८ मार्चला अर्थसंकल्प

आर्थिक पाहणी अहवालात कोरोनाचा मोठा फटका राज्याच्या अर्थव्यवस्थेला बसल्याचे म्हटले आहे. आठ मार्च रोजी अजित पवार अर्थसंकल्प सादर करतील. आता अधिवेशनाच्या शिल्लक असलेल्या तीन दिवसात अर्थसंकल्प मंजूर करणे, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक हे सरकारपुढे आव्हान आहे. सरकार सावरते की नाही दिसेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER