आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात, सरकारची कोंडी होण्याची शक्यता

Budget session

मुंबई : राज्याच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Budget session) आजपासून सुरूवात झाली आहे. या अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी मोठीरणनीती आखली असून, सरकार त्यांच्या प्रश्नांना कसे उत्तर देतील याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. विरोधकांची आक्रमक भूमिका लक्षात घेता हे अधिवेशन वादळी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव आल्यानंतर वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी कालच आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे सोपवला आहे. मात्र त्यानंतरही राठोडांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आक्रमक आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. त्यामुळे पूजा चव्हाण प्रकरणावरुन हे अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे. तसेच मराठा आरक्षणप्रश्नावर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या अधिवेशनात अनेक विधेयक मांडण्यात येणार आहेत.

या विधेयकांवर चर्चा होणार…

अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रस्तावित विधेयकांमध्ये शक्ति फौजदारी कायदा (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2020, ( महिलांवरील अत्याचाराच्या घटनांच्या अनुषंगाने भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 व मुलांचे लैंगिक गुन्ह्यांपासून प्रतिबंध अधिनियम, 2012 यामधील तरतूदींमध्ये सुधारणा करणे, नविन कलमांचा समावेश करणे, शिक्षेत वाढ करणे (गृह विभाग) , तर प्रलंबित विधेयकांत महाराष्ट्र अनन्य विशेष न्यायालये (शक्ति कायद्याखालील महिलांच्या व बालकांच्या विरूध्दच्या विवक्षित अपराधांसाठी) विधेयक, 2020 (गुन्ह्यास आळा घालणे आणि गुन्ह्यातील तपास जलद गतीने करण्यासाठी विशेष पोलीस पथके निर्माण करणे, अशा प्रकरणांसाठी स्वतंत्र अनन्यसाधरण न्यायालये निर्माण करून ३० कामकाज दिवसांच्या कालावधीत प्रकरणे निकाली काढण्यासाठी व्यवस्था निर्माण करणे) यांचा समावेश आहे.

प्रस्तावित विधेयके…

महाराष्ट्र मुद्रांक (सुधारणा विधिग्राह्यीकरण) विधेयक, 2021 (महसूल व वन विभाग), महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ विधेयक, 2021, महाराष्ट्र गुंठेवारी विकास (अधिनियमन करणे, श्रेणीवाढ व नियंत्रण) (सुधारणा) विधेयक, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (सुधारणा), विधेयक, 2021 यांचा समावेश आहे. तर प्रस्तावित अध्यादेश महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (सुधारणा), अध्यादेश, 2021 (वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग) (कोविड-19 साथ रोगाच्या पार्श्वभूमीवरती 2021 यांचा समावेश आहे. तर प्रस्तावित अध्यादेशात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (सुधारणा), अध्यादेश, 2021, महाराष्ट्र गुंठेवारी विकास (अधिनियमन करणे, श्रेणीवाढ व नियंत्रण) (सुधारणा) अध्यादेश यांचा समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER