अर्थसंकल्पीय अधिवेशन आठच दिवसांचे!

Vidhan sabha

मुंबई : करोनाच्या साथीमुळे राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आठ दिवसांचे घेण्याचा निर्णय गुरुवारी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. अर्थसंकल्प ८ मार्च रोजी मांडला जाणार असून १० मार्चला अधिवेशनाचा समारोप होईल.

गेल्या वर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच करोनाची साथ सुरू झाली होती. त्यामुळे अधिवेशन लवकर गुंडाळण्यात आले. त्यांनतर पावसाळी आणि हिवाळी या दोन्ही अधिवेशनांमध्येही एक-दोन दिवसांचे कामकाज झाले होते.

संसदेच्या अधिवेशनाप्रमाणे अर्थसंकल्पीय अधिवेशन पूर्णवेळ चालावे, अशी मागणी भाजपाने केली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला असून काही मंत्र्यांनाही करोनाची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या गुरुवारच्या बैठकीत अधिवेशनाचा कार्यक्रम आटोपशीर ठरविण्यात आला.

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १ ते १० मार्च चालणार असून प्रत्यक्ष कामकाज आठ दिवस होणार आहे. पहिल्या आठवडय़ात राज्यपालांचे अभिभाषण, सत्ताधारी तसेच विरोधकांचा प्रस्ताव, पुरवणी मागण्या एवढेच कामकाज होईल. अर्थसंकल्प ८ मार्चला सादर होईल. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर खातेनिहाय मागण्यांवर चर्चा होते; यंदा ही चर्चा होणार नाही. मंत्री तसेच आमदारांनाही करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कमी दिवसांचा कार्यक्रम ठरविण्यात आला, अशी माहिती संसदीय कामकाजमंत्री अनिल परब यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER