
नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज संसदेत बजेट २०२१ (Budget 2021) सादर केले. या बजेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सर्वसामान्यांची जीवनशैली वाढवण्यावर या अर्थसंकल्पात जोर देण्यात आला आहे. हा अर्थसंकल्प सर्वच क्षेत्रात अत्यंत सकारात्मक बदल आणणार आहे. मी यासाठी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) व त्यांचे सहकारी अनुराग ठाकूर व त्यांच्या टीमला शुभेच्छा देतो. हे आत्मनिर्भर भारताचं आत्मनिर्भर तसेच विकास आणि विश्वासाचं बजेट आहे. आत्मनिर्भर भारतच्या मार्गाला जाणारं हे बजेट आहे. अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदी यांनी प्रतिक्रिया दिली.
कोरोना संकटाने संपूर्ण मानव जातीला हादरवून सोडलं. सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आजचे बजेट भारताच्या आत्मविश्वासाला जागृत करणारे आहे. त्याचबरोबर हे बजेट जगात एक वेगळा आत्मविश्वास निर्माण करणारे आहे. आजच्या बजेटमध्ये आत्मनिर्भरतेचं ध्येय आहे. याशिवाय प्रत्येक नागरिक आणि प्रत्येक वर्गाचा समावेश आहे. ‘आत्मनिर्भर भारत’च्या मार्गाला जाणारे हे बजेट आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. ग्रोथसाठी नव्या संकल्पनांचा विस्तार करायचा, तरुणांसाठी नव्या संधी निर्माण करायच्या, मानव संसाधनासाठी कामे करायची, इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करण्यासाठी नवनव्या क्षेत्रांना विकसित करणं, आधुनिकतेच्या दिशेला पुढे चालायचं, नव्या सुधारणा आणायच्या, हे या बजेटचे सिद्धांत आहेत, असं मोदींनी सांगितलं. नियम आणि प्रक्रियेला सरळ बनवून सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात इज ऑफ लिव्हिंगला वाढण्यावर जोर दिला गेला आहे.
हे बजेट वैयक्तिक, गुंतवणूकदार आणि इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमध्ये खूप सकारात्मक बदल घडवून आणणारे आहे. मी यासाठी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण, मंत्री अनुराग ठाकूर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन करतो, असं मोदी म्हणाले. विशेष म्हणजे बजेट सादर होताच सुरुवातीच्या दोन तासांमध्ये अनेक सकारात्मक गोष्टी समोर आल्या आहेत. कोरोना संकट सुरू असल्याने सरकार सर्वसामान्यांवरील ओझं वाढवेल, असा अंदाज अनेक तज्ज्ञांनी वर्तवला होता. मात्र, सरकारने बजेट ट्रान्स्परंट असण्यावर भर दिला आहे. अनेकांनी या बेजटचं स्वागत केलं आहे, असा दावा त्यांनी केला. या बजेटमध्ये देशातील प्रत्येक क्षेत्राचा विचार केला गेला आहे. उत्तरेकडे लेह-लडाख, दक्षिण आणि पूर्व राज्यांमध्ये विकासाचं ध्येय ठेवण्यात आलं आहे. या बजेटमध्ये कोस्टल स्टेट जसे तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल या राज्यांना एक बिझनेस पॉवर बनवण्याच्या दृष्टिकोनानं महत्त्वपूर्ण पाऊल उचललं गेलं आहे.
या बजेटमुळे युवकांना ताकद मिळेल. भारत उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलेल, असं मोदी म्हणाले. महिलांचं जीवन आणखी सुरळीत करण्यासाठी त्यांच्या आरोग्यासाठी, स्वच्छता, पोषक अन्न आणि पाण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. बजेटमध्ये रोजगार, अॅग्रीकल्चर सेक्टरसाठी अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. कृषी उत्पन्न बाजार समित्यांना आणखी बळकट करण्यासाठी पावलं उचलण्यात आली आहेत. हे बजेट ‘आत्मनिर्भर भारत’च्या मार्गाला जाणारे आहे; ज्यामुळे देशाच्या प्रत्येक नागरिकाची प्रगती यामध्ये सामील आहे, असंदेखील पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला