भाऊंचे फुटाणे आणि दादांचे फटाके…

Girish Bapat - Chandrakant Patil Editorial

Shailendra Paranjapeभूमीपुत्रांच्या नावानं राजकारण केलं जातं ते स्थानिक पक्षांकडून, प्रादेशिक पक्षांकडून. राष्ट्रीय पातळीवरच्या पक्षांना मात्र प्रादेशिक किंवा स्थानिकतेपेक्षा राष्ट्रीय प्रश्नांना हात घालावा लागतो. प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्षांच्या काही बलस्थानांबरोबरच काही कच्च्या दुव्यांनाही या वैशिष्ट्यांमुळंच सामोरं जावं लागतं. त्याचं प्रत्यंतर विविध राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दिसून येतं.

नथिंग सक्सीड्स लाइक सक्सेस आणि डिफीट इज ऑलवेज फॉलोड बाय ब्लेम्स, अर्थात यशासारखं दुसरं चांगलं काही नाही आणि प्रत्येक पराभवानंतर खापर फोडलं जाणं किंवा त्याची जबाबदारी अंगावर पडणं, हे ओघानंच येतं. या उक्तीचं प्रत्यंतर बिहारच्या निवडणूक निकालानंतर येतच आहे. पंतप्रधान नरेन्द्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या सभांमुळं बिहारमधे यश मिळालंय पण भारतीय जनता पक्षाचे (BJP) बिहारमधले नेते सुशील मोदी (Sushil Modi) हे मात्र कायमच अनसंग हिरो राहणार आहेत.

बिहारमधे (Bihar) लालूप्रसाद (Lalu Prasad Yadav) यांचे चिरंजीव तेजस्वी (Tejashwi Yadav) यांनी लक्षणीय कामगिरी बजावलीच आहे. पण त्यांचं कौतुक करताना नितीशकुमार अखेर जिंकले आहेत, हे विसरून चालणार नाही. नितीशकुमार (Nitish Kumar) यांनीही इतिहासच घडवला आहे याचीही नोंद भविष्यात इतिहास लिहू इच्छिणाऱ्यांना घ्यावीच लागणार आहे.

राष्ट्रीय पातळीवर गाजत असलेल्या बिहारच्या निवडणूक निकालानंतर महाराष्ट्रातल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातली निवडणूक आता वातावरण तापवत आहे. या निवडणुकीच्या उमेदवारांचे अर्ज भरण्याच्या निमित्ताने माध्यमांना सामोरे जाताना राष्ट्रवादी कॉँग्रेसचे (NCP) अध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना चिमटे काढलेत. भाजपा नेत्यांनी पुढची चार वर्षे सरकार पडण्याची स्वप्नंच बघावीत, असा सल्ला त्यांनी दिलाय. त्याला प्रत्युत्तर देताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटलांना सुनावलंय की तुम्हाला फुकटचं मिळालंय, ते आधी खा आणि मग आम्हाला सल्ले द्या.

बिहारमधे सर्व प्रकारचं युद्ध झाल्यानंतर महाराष्ट्रातही वाग्युद्ध झालं. पण त्याहीपेक्षा रंजक ठरला तो गिरीश बापट आणि चंद्रकांत पाटील यांच्यातला सामना. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने झालेल्या मेळाव्यात गिरीशभाऊ आणि चंद्रकांतदादा यांनी परस्परांची चांगलीच खेचली.

पुण्याची गोडी इतकी की चंद्रकांतदादा (Chandrakant Patil) आता पुण्यातच आलेत, असं बापट यांनी सांगितलं. ते सांगताना कुठूनही पार्सल आले तरी ते व्हाया पुणे दिल्लीला जाते, असं बापट म्हणाले. बापट मूळचे अमरावतीचे आणि ते पुण्यातून लोकसभेवर खासदार म्हणून दिल्लीला गेलेत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा अर्थ कोल्हापूरचे चंद्रकांत पाटील आता २०२४ला खासदारकीचे भाजपाचे उमेदवार असा घ्यायचा का…कारण बापटांचं वय २०२४ मधे भाजपाच्या निकषात बसणारं नाही.

इतर पक्षातल्या नाराजांना फुटाणे देऊन आपलेसे करण्याचे कसब बापटांकडे आहे, अशा शब्दात गिरीश बापट यांच्या सर्वपक्षीय मित्र करण्याच्या स्वभावावर पाटील यांनी प्रकाश टाकला. पदवीधर निवडणुकीत बोगस मतदान रोखण्यासाठी टगे पोलिंग एजंट नेमा, असे चंद्रकांतदादा पाटील म्हणाले. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या संदर्भात टगेगिरीचा शब्द यापूर्वी वापरला गेलेला असल्याने चंद्रकांतदादांच्या या टगे पोलिंग एजंट नेमण्याच्या सूचनेमुळे एकच हशा पिकला.

भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे. पण बापट काय किंवा पाटील काय, हे दोघेही पुण्याबाहेरचे आणि ते पुण्याच्या राजकारणावर सत्ता गाजवत आहेत. त्यामुळे प्रादेशिकतेच्या मर्यादा ओलांडून अमरावती आणि कोल्हापूरहून पुण्यात येऊन पुण्याचे भाऊ दादा झालेल्या या दोघांनीही राष्ट्रीय पक्षात स्थानिक नेतेपणही सर्व अस्मिता ओलांडून मिळवता येतं, हेच सिद्ध केलंय.

बाकी गिरीशभाऊ असोत काय किंवा चंद्रकांतदादा, त्यांचे स्थानिक पातळीवर म्हणजे अमरावती किंवा कोल्हापूर इथं असलेलं वजन आणि दोघांच्याही अंगात असलेले सुप्त गुण, यांची माहिती परिवारातल्या सर्वांनाच आहे. परिवारातल्या हा शब्द मुद्दामच वापरतोय. कारण त्यांच्या अंगातले गुण लक्षात घेऊनच दादा भाऊंना जबाबदाऱ्या दिल्या गेल्या आहेत, पुढेही त्या गुणांप्रमाणेच मिळतील. दादा कुठेही जाऊन जबाबदारी पार पाडतील तर भाऊ फुटाणे घेऊन कामगिरीसाठी सिद्ध होतील.

Disclaimer :- ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER