ब्रिस्बेन कसोटी म्हणजे डेव्हिड आणि गोलियथची लढाई!

David vs Goliath

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानची (India Vs Australia) ब्रिस्बेन (Brisbane) कसोटी ही डेव्हिड आणि गोलियथ अशी लढाई आहे. एकीकडे घरच्या मैदानावर खेळणारा अनुभवी ऑस्ट्रेलियन संघ आणि दुसरीकडे खेळाडूंच्या दुखापतींनी त्रस्त नवख्या खेळाडूंचा पाहुणा भारतीय संघ, एकीकडे ऑस्ट्रेलियाने ब्रिस्बेनच्या गब्बा मैदानावर 1988 पासून एकही कसोटी सामना गमावलेला नाही आणि दुसरीकडे भारताने या मैदानावर एकसुध्दा सामना जिंकलेला नाही, ऑस्ट्रेलियन संघाच्या एकूण धावा 23 हजाराच्यावर आणि भारतीय संघाच्या धावा साधारण 15 हजार, त्यात पाच खेळाडूंच्यातर अद्याप 10 सुध्दा कसोटी धावा नाहीत आणि सर्वात महत्त्वाचा फरक म्हणजे ऑस्ट्रेलियन प्लेइंग इलेव्हनच्या नावावर एकूण 1046 विकेट आणि टीम इंडियाच्या नावावर फक्त 13 विकेट…! तब्बल 1033 विकेटचा फरक…!

कळस म्हणजे या सामन्यात भारताचे जे पाच गोलंदाज आहेत, मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) , टी. नटराजन (T Natrajan) , शार्दूल ठाकुर (Shardul Thakur) , नवदीप सैनी (Navdeep Saini) आणि वाॕशिंग्टन सुंदर (Washington Sundar) या पाचींच्या नावावर या मालिकेच्या आरंभी एकही कसोटी बळी नव्हता. शार्दुल वगळता इतर चौघांनी याच मालिकेत पदार्ण केले आणि ठाकूरने 2018 मध्ये वेस्ट इंडिजविरुध्द फक्त 10 चेंडू गोलंदाजी केलेली होती.

कोणताही संघ आपला सर्वात पहिला कसोटी सामना खेळतो तेंव्हा अशी स्थिती असते. भारताची 1932 मध्ये पहिल्या सामन्यात अशीच स्थिती होती. त्यानंतर पहिल्यांदाच अशी वेळ आली आहे.

दक्षिण आफ्रिकेचा संघ बंदी उठल्यावर 1990 च्या आसपास आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला होता तेंव्हा त्यांचीही अशीच स्थिती होती पण त्यांनी अनुभव नसतानाही आपल्या गोलंदाजीने तो सामना गाजवला होता. आता भारतीय गोलंदाजसुध्दा तेच करत आहेत आणि पहिल्या दिवशी त्यांनी निम्मा ऑस्ट्रेलियन संघ 213 धावात बाद केला आहे. एकवेळ 2 बाद 17 आणि 3 बाद, 87 अशी स्थिती होती. टी. नटराजनने पदार्पणात शतकवीर लाबूशेनसह दोन गडी बाद केले आहेत. शार्दुल ठाकूरने ऑस्ट्रेलियातील आपल्या पहिल्याच चेंडूवर मार्कस हॕरिसची विकेट काढली तर वाॕशिंग्टन सुंदरने आपला आयपीएलचा कर्णधार स्टिव्ह स्मीथची झटपट विकेट काढून पदार्पण साजरे केले. तिसराच कसोटी सामना खेळताना आक्रमणाची धुरा वाहणाऱ्या मोहम्मद सिराजने पहिल्याच षटकात वाॕर्नरचा अडथळा दूर केला. याप्रकारे दिवसअखेर ऑस्ट्रेलिया 5 बाद 274 आहे आणि भारताची कामगिरी समाधानकारक आहे.

संघात जसप्रीत बुमरा, मोहम्मद शामी, रवीचंद्रन अश्विन, उमेश यादव व रवींद्र जडेजा असताना कुणी कल्पनाही केली नव्हती की या मालिकेत हे पाचही जण भारतीय गोलंदाजीची धुरा सांभाळतील. पण ते घडलेय आणि 1046 विकेटचा अनुभव विरुध्द फक्त 13 विकेटचा अनुभव असा संघर्ष आपण पाहतोय.

हा 1033 विकेटचा फरक आपल्याला फार मोठा वाटत असला तरी 2006 च्या ऑस्ट्रेलिया व बांगलादेशदरम्यानच्या सामन्यावेळी हाच फरक 1100 च्यावर होता. विकेटसची संख्या पाहिली तर 1880 नंतर ऑस्ट्रेलियासाठी हा असा पहिला सामना आहे. 1880 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुध्द खैळलेल्या इंग्लंडच्या सर्व गोलंदाजांच्या नावावर मिळून फक्त 8 विकेट होत्या. तर भारतासाठी 1932 च्या पहिल्या कसोटीनंतर 1946 च्या लाॕर्डस् कसोटीवेळी भारतीय गोलंदाजांच्या नावावर एकूण फक्त 5 विकेट (लाला अमरनाथ 4 व सी. के. नायडू 1) होत्या. त्यानंतर आता फक्त 13 विकेट आहेत. आता ह्या 13 विकेट जर 1046 विकेटला भारी पडल्या तर डेव्हिड आणि गोलियथची कथा सत्यात उतरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER