पत्रकार सिद्दिक कप्पान यांना दिल्लीत आणून उपचार करा

Siddique Kappan - supreme court - Maharashtra Today
Siddique Kappan - supreme court - Maharashtra Today
  • उ. प्र. सरकारचा विरोध झुगारून सुप्रीम कोर्टाचा आदेश

नवी दिल्ली : एका दलित मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिचा खून केल्याच्या घटनेचे वृत्तांकन करण्यासाठी हाथरस येथे जात असता उत्तर प्रदेश पोलिसांनी सहा महिन्यांपूर्वी अटक केलेले व आजारी असलेले केरळचे पत्रकार सिद्दिक कप्पान यांना दिल्लीत आणून तेथील एखाद्या सरकारी इस्पितळात त्यांच्यावर उपचार केले जावेत, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला.

उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केलेला प्रखर विरोध झुगारून सरन्यायाधीश न्या. एन. व्ही. रमण, न्या. सूर्यकांत व न्या. ए. एस. बोपण्णा यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. कप्पान यांना मथुरा कारागृहातून दिल्लीत आणावे व ‘एम्स’, राम मनोहर लोहिया अथवा अन्य एखाद्या सरकारी इस्पितळात त्यांच्यावर उपचार करावेत आणि ते बरे झाल्यावर त्यांना पुन्हा मथुरा कारागृहात नेण्यात यावे, असा आदेश देण्यात आला.

‘केरळ युनियन ऑफ वर्किंग जर्नालिस्ट’ने केलेल्या ‘हेबियस कॉर्प्स’ याचिकेवर हा आदेश झाला. ही याचिका गेल्या ऑक्टोबरमध्येच करण्यात आली होती व ती कप्पान यांना जामिनावर सोडण्यासाठी होती. परंतु सात-आठ तारखांंना ती सुनावणीसही घेण्यात आली नव्हती. न्या. रमण २४ एप्रिल रोजी सरन्यायाधीश जाल्यावर लगेच कप्पान यांच्या पत्नीने त्यांना पत्र लिहून ‘माझ्या पतीला जनावरासारखे साखळीने बांधून ठेवले आहे. त्यांचा जीव धोक्यात आहे. कृपया लगेच हस्तक्षेप करून त्यांचा जीव वाचवा’, असे साकडे घातले होते.

त्यानंतर लगेच ही याचिका सुनावणीस घेण्यात आली. न्यायालयाने कप्पान यांचे वैद्यकीय अहवाल मंगळवारीच मागवून घेतले होते. बुधवारी सकाळी सुनावणी सुरु झाल्यावर खंडपीठाने कप्पान यांना दिल्लीला आणण्याचा आदेश देण्याचे सूचित केले व मेहता यांना त्यावर दु. १पर्यंत उत्तर देण्यास सांगितले. सुरुवातीस मेहता यांनी उद्या गुरुवारी सुनावणी घेण्याची विनंती केली. ती अमान्य झाल्यावर त्यांनी कप्पान यांना दिल्लीला आणण्यास विरोध करणारा घणाघाती युक्तिवाद केला.

मुळात कप्पान वैध न्यायालयीन आदेशाने कोठडीत असताना कोण्या एका ‘फुटकळ’ पत्रकार संघटनेने त्यांच्या सुटकेसाठी ही याचिका करावी, यालाच मेहता यांना पहिला आक्षेप होता. शिवाय उत्तर प्रदेशमध्ये सर्व प्रकारच्या वैद्यकीय उपचारांची उत्तम सोय असूनही, दिल्लीत सध्या कोरोनाचे थैमान सुरू असताना कप्पान यांच्यासाठी सरकारी इस्पितळात एक रुग्णखाट त्यांच्यासाठी का अडवून ठेवायची, असा त्यांचा सवाल होता. मथुरा कारागृहात कोरोना झालेले १०० कैदी असताना, कोरोना न झालेल्या कप्पान यांना ही वेगळी वागणूक का?, असेही त्यांनी विचारले. ते म्हणाले की, केरळहून कुटुंबियांच्या येण्या-जाण्याच्या सोयीचा विचार करायचा असेल तर मथुरेहून थेट केरळला जाणार्‍या दिवसातून सात रेल्वेगाड्या आहेत, असेही त्यांनी निदर्शनास आणले.

मेहता यांच्या युक्तिवादाचा बाकीचा भाग कप्पान यांना जामीन का देऊ नये, यासंबंधीचा होता. परंतु न्यायालयाने स्पष्ट केले की, आम्ही माणुसकी म्हणून कप्पान यांना फक्त उपचारांसाठी दिल्लीत आणण्याचा विचार करत आहोत. बरे झाल्यानंतर त्यांनी नियमित जामिनासाठी सुयोग्य न्यायालयात अर्ज करावा.

पत्रकार कप्पान हे ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या काही राज्यांनी बंदी घातलेल्या संघटनेचे हस्तक आहेत. ते हाथरस घटनेच्या निमित्ताने जातीय कलह पसरवून दंगली घडविण्याच्या उद्देशाने तेथे चालले होते, असा आरोप करून उत्तर प्रदेश सरकारने त्यांना अटक केली आहे.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button