औरंगाबाद ग्रीन झोन मध्ये आणावे – सुभाष देसाई

Subhash Desai- Maharashtra Labor Bureau

औरंगाबाद : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना संसर्ग रोखण्यात यंत्रणेला यश मिळत आहे. ही समाधानकारक बाब असून याच पद्धतीने शहरातील कोरोना संसर्गही आटोक्यात आणून औरंगाबादला ग्रीन झोनमध्ये आणावे, असे निर्देश राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठक पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली, यावेळी त्यांनी संबंधितांना निर्देश दिले. यावेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपा आयुक्त तथा प्रशासक आस्तिक पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदावले, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी रिजा मेत्रेवार, जिल्हा पुरवठा अधिकारी महादेव किरवले, घाटी रुग्णालयाचे डॉ. शिवाजी सुक्रे, औषधशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. मिनाक्षी भट्टाचार्य, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुदंर कुलकर्णी, मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर, जिल्हा कृषी अधीक्षक तुकाराम मोटे, कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेऊन पालकमंत्री यांनी शहरातील रुग्ण संख्या नियंत्रीत करण्यासाठी टास्क फोर्सच्या सूचनांप्रमाणे उपचार पद्धती अधिक सशक्त करण्याचे निर्देश दिले. लोकांची मानसिकता मजबूत करणे ही एक महत्वाची बाब असून त्यादृष्टीने मनपाने वॉर्ड निहाय ज्या ठिकाणी गरजेचे असेल तिथे ताप तपासणी शिबिरांचे आयोजन मोठ्या प्रमाणात करावेत, यातून लोकांच्या मनातील आजाराबद्दची भीती कमी होण्यास मदत होईल. यामध्ये खाजगी डॉक्टरांची मदत घ्यावी. जिल्हा रुग्णालय, घाटी व इतर रुग्णालय, उपचार केंद्रात सर्व आवश्यक सोयी सुविधा सज्ज ठेवण्यास प्राधान्य द्यावे. ऑक्सीजनचा, रक्ताचा व्यापक साठा उपलब्ध करुन ठेवावा. अतिगंभीर रुग्णांसाठी आवश्यक औषधोपचार, इंजेक्शन, व्हेंटीलेटर यासह इतर गरजेच्या सर्व सुविधा तातडीने सज्ज ठेवाव्यात, अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

लॉकडाऊनमध्ये बिगर रेशनकार्डधारकांना शासनाने मोफत मे, जून महिन्यासाठी प्रति व्यक्ती पाच किलो तांदूळ देण्याचा निर्यण घेतला आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्यात करावी. विनाअडथळा गरजूंना हे धान्य मोफत उपलब्ध करुन द्यावे. रेशन वितरणात घोळ करणाऱ्या दुकानदारांवर कडक कारवाई करावी, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी संबंधितांना दिले.

राज्यात काही ठिकाणी टोळधाडीचे संकट निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रतिबंधात्मक यंत्रणा सज्ज ठेवावी. खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य, मार्गदर्शन कृषी विभागाने उपलब्ध करुन द्यावे. ग्रामीण आणि शहरी भागातील पाणी पुरवठा सुरळीत ठेवावा. टँकरद्वारे करण्यात येणारा पाणी पुरवठा पावसाळ्यापर्यंत व्यवस्थित सुरु राहील याची कटाक्षाने काळजी घ्यावी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी संबंधितांना दिल्या.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER