स्तनपान व आईच्या मायेची उब हा अर्भकांचा जन्मसिद्ध हक्क

आठ महिन्याच्या मुलाचा ताबा दिला मातेकडे

gujrat HC

अहमदाबाद : प्रेमाची उब आणि सुरक्षा देणार्‍या आईच्या कुशीत गुरफटून राहणे हा तान्ह्या मुलांचा जन्मसिद्ध हक्क आहे. आईचे दूध हे त्यांचे सर्वात सकस अन्न आहे व तोच त्यांच्या भावी सुदृढतेचा भक्कम पाया आहे. त्यामुळे अर्भकांना या दोन्हींपासून हिरावले जाऊ शकत नाही, असे नमूद करून गुजरात उच्च न्यायालयाने (Gujarat High Court) आठ महिन्यांच्या एका मुलाचा ताबा त्याच्या मातेकडे सोपविण्याचा आदेश दिला.

दिव्याकुमारी केवलकुमार भट या मातेने पती आणि सासू-सासरे यांच्याकडून मुलाचा ताबा मिळविण्यासाठी केलेल्या ‘हेबियस कॉर्प्स’ याचिकेवर न्या. सोनिया गोकाणी व न्या. निर्झर देसाई यांच्या खंडपीठाने हा आदेश देताना म्हटले की, लहान मुलाच्या उत्तम आरोग्यासाठी आणि त्याची योग्य वाढ होण्यासाठी आईचा सहवास हा मुलांचा हक्क आहे. पण लहान असल्याने ते मूल स्वत: कोर्टाकडे दाद मागू शकत नसल्याने आम्ही त्याला त्याचा हा हक्क त्याच्या आईच्या याचिकेच्या माध्यमातून देत आहोत.

सर्वसाधारणपणे वैवाहिक तंटे आणि मुलांचा ताबा याविषयीची प्रकरणे कुटुंब न्यायालयात चालतात. परंतु कुटुंब न्यायालय बंद असल्याने व तेथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधा नसल्याने उच्च न्यायालयाने आपल्या रिट अधिकारक्षेत्रात (Writ Jurisdiction) आईची याचिका ऐकली.

याचिका करणाºया या मातेचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले. सुरुवातीपासूनच सासरी छळ होत असे. बाळंतपणानंतरही हा त्रास कमी न झाल्याने ती सासरच्या घरातून बाहेर पडून तिच्या आजोबांकडे राहायला गेली. पण पती व सासू-सासºयांनी मुलाला तिच्यासोबत न देता जबरदस्तीने स्वत:जवळ ठेवून घेतले.

हायकोर्टाने मुलाला हजर करण्याचा आदेश दिल्यावर महिला पोलीस ठाण्याच्या महिला अधिकार्‍याने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने मुलाला कोर्टापुढे हजर केले. पती व सासू-सासरेही त्याच्यासोबत होते.

सासू-सासरे नातवाचे संगोपन चांगले करत असावेत, असे न्यायालयास मुलाच्या एकूण रूपड्यावरून दिसले. तरी त्या तान्हुल्याला आईच्या मायेची उब मिळायलाच हवी, असे न्यायालयाने म्हटले. निदान मुलासाठी तरी मतभेद बाजूला ठेवा आणि शक्य असल्यास एकत्र नांदा, असा सल्लाही न्यायालयाने माता-पित्यांना दिला. गेल्या शनिवारी प्रधान जिल्हा न्यायाधीशांच्या समक्ष मुलाला आईकडे सुपूर्द करण्यात आले.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER