अभिनयातला ‘ब्रेक’ बनला लेखनासाठी ‘ब्रेक’

Marathi Actress Mugdha Godbole

कुटुंब की काम हे दोन पर्याय निवडण्याची वेळ जेव्हा कोणत्याही स्त्रीवर येते तेव्हा ती तिच्या कुटुंबाला प्राधान्य देते. मग सेलिब्रिटी कलाकारदेखील याला अपवाद नाहीत. अभिनयाचा करिअरची गाडी छानपणे मार्गाला लागली असतानाच मुलांच्या संगोपनासाठी अनेक अभिनेत्रींना ब्रेक घ्यावा लागतो. असाच ब्रेक अभिनेत्री मुग्धा गोडबोले (Mugdha Godbole) हिच्या आयुष्यात आला पण अभिनयातला ब्रेक तिच्यातील लेखन कौशल्याला ‘ब्रेक’ देणारा ठरला. मुलीच्या संगोपनासाठी अभिनयापासून विश्रांती घेत मुग्धा घरी थांबली होती त्याच काळात तिला होणार सून मी या घरची या मालिकेचे लेखन करण्याची संधी मिळाली. आणि हाच तिच्या मालिकेची लेखिका म्हणून करिअरसाठी ब्रेक ठरला. त्यानंतर अभिनेत्री मुग्धा गोडबोले यापेक्षा मालिकेची लेखिका मुग्धा गोडबोले ही ओळख कमावली आहे.

गेल्या दीड वर्षापासून’ ‘आई कुठे काय करते’ ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरलेली आहे. आई कुठे काय करते हा प्रश्न आपण अनेकदा सहज बोलून जातो, पण आई खरंच काय करते हे या मालिकेच्या माध्यमातून समाजाला समजावे या उद्देशाने या मालिकेची कथा रचण्यात आली. पटकथा तर तयार होती पण आता या पटकथेमध्ये संवाद लेखनाचं काम कोण करणार अशी जेव्हा चर्चा या मालिकेच्या निर्मिती टीममध्ये सुरू झाली तेव्हा मुग्धा गोडबोलेचे नाव पुढे आलं. सध्या मुग्धा या मालिकेत एक डॉक्टर व्यक्तिरेखादेखील साकारत आहे. याशिवाय या मालिकेच्या संवाद लेखनाची धुरादेखील ती सांभाळत आहे. मालिकेचे संवाद लेखन करणं हे खूप वेगळं तंत्र असं ती आवर्जून सांगते.

मुग्धा सांगते, मालिका ही प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोहोचत असते ती त्यातल्या दृश्यांच्या माध्यमातून, त्यातल्या नाट्याच्या माध्यमातून, कथेमध्ये सतत येणारे ट्विस्ट हा मालिकेचा युएसपी आहे. त्यामुळे तो ट्विस्ट रंजक बनवणं हे काम लेखिका म्हणून खूप जबाबदारीचं वाटतं. शिवाय मालिकेचे तंत्र वेगळे आहे, ते तंत्र सांभाळत मालिकेमध्ये येणारी सगळी वळणं समजून घेताना कस लागतो. कलाकारांना अनेकदा मोठ्या सुट्टीवर जावे लागते, गेल्या वर्षभरामध्ये अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली होती त्या काळामध्ये हे कलाकार मालिकांमध्ये दिसणार नव्हते. त्यामुळे त्यांच्या त्यादृष्टीने मालिकेच्या लेखनात काही बदल करावे लागतात. या सगळ्याची तयारी ठेवत मालिकांचे संवादलेखन करावं लागतं.

मुग्धा गोडबोले ही रंगभूमी वरची कलाकार आहे. पुण्यामध्ये शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात तिच्यावर नाट्य संस्कार झाले. तिने बालकलाकार म्हणून नाटकात काम केलं. ती महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाही वेगवेगळी नाटकं करत होती. दरम्यान थरार या एका मालिकेत दिग्दर्शक संजय पवार यांना भेटण्यासाठी ती त्या मालिकेच्या सेटवर गेली होती. त्याच वेळी त्या मालिकेतील एक कलाकार आजारी पडल्याने शूट थांबलं होतं. पॅकअप करणं शक्य नव्हतं आणि त्यावेळी तिथे असलेल्या मुग्धाला भूमिका करण्याची ऑफर अचानक मिळाली आणि होकार दिला आणि त्यानंतर मात्र मुग्धाकडे खूप सार्‍या मालिकांच्या ऑफर्स यायला लागल्या. तिलादेखील मालिका करायला आवडू लागलं आणि आभाळमाया या मालिकेत तिने तिची भूमिका चांगली निभावली. यासोबत कदाचित या सिनेमापासून तिची मोठ्या पडद्यावरची कारकीर्द सुरू झाली. होम स्वीट होम या सिनेमाचं लेखनही मुग्धाने केलं होतं.

मुग्धा सांगते, जेव्हा माझी मुलगी लहान होती तेव्हा मला अभिनयापासून लांब राहण्याशिवाय पर्याय नव्हता . त्यावेळी मी मालिकांमध्ये काम करत होते आणि मालिकेचं शेड्युल जवळपास १६ तासांचं असतं. तसंच नाइट शिफ्ट असतात. इतका वेळ मी घरापासून लांब राहू शकत नव्हते. त्यामुळे मी काही दिवस थांबायचं ठरवलं. त्याच दरम्यान होणार सून मी या घरची या मालिकेच्या संवाद लेखन विषयी ऑफर आल्यानंतर मी हे काम करायचं ठरवलं. अर्थात मालिकेचे लेखन त्यापूर्वी कधीच केलं नव्हतं पण आई मंगल गोडबोले लेखिका असल्यामुळे लहानपणापासून सकस वाचण्याची सवय लागली होती आणि लेखनाची आवड होती. त्यातूनच मालिकेच्या संवाद लेखनाचे तंत्र आत्मसात करून घेतलं. स्क्रीन प्ले लिहिणाऱ्या कलाकारांकडून येणारी पटकथा आणि त्यावर आधारित संवाद लिहिणे हे काम आता माझ्या खूप आवडीचं झालं आहे. महत्त्वाचं म्हणजे मालिकेतील व्यक्तिरेखा कशी आहे, तिचा स्वभाव कसा आहे, ती कुठल्या कौटुंबिक स्तरामध्ये दाखवण्यात आलेली आहे या सगळ्याचा विचार करून शब्द लिहावे लागतात. गेल्या काही दिवसात मालिकांमध्ये फक्त मुंबईचाच संदर्भ नसतो तर वेगवेगळ्या शहरांमध्ये राहणारी कुटुंबं मालिकेत दाखवली जातात.त्यामुळे त्या त्या शहराची भाषा त्यांच्या संवादामध्ये आणण्यासाठी लेखक म्हणून सतत अपडेट राहावं लागतं. अभिनेत्री म्हणून जेवढा आनंद मला माझ्या कामाने दिला त्यापेक्षा जास्तच आनंद आणि समाधान मला मालिकांची संवाद लेखिका म्हणून मिळत आहे. कारण की अभिनय करत असताना मी फक्त माझ्या भूमिकेचा विचार करत होते. माझी भूमिका कशी चांगली होईल ही माझी जबाबदारी असायची, पण मालिकेची संवाद लेखिका म्हणून मला मालिकेतल्या प्रत्येक पात्राचा अभ्यास करावा लागतो. मला प्रत्येक पात्र समजून घ्यावं लागतं हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER