” सगळे मिळून सगळ्यांसाठी जगण्यामध्ये ब्रम्हानंद. ” ( गोष्टी मोठ्यांच्या पालकत्वाच्या ! भाग १)

Guardian

फ्रेंड्स ! आपल्याला नेहमीच कुठल्याही मोठ्या व्यक्ती मग त्या लेखक, गायक ,अभिनय क्षेत्रातल्या राजकारणी ,चित्रकार किंवा विविध कला प्रकार क्षेत्रातील किंवा विद्वान संशोधक यासारख्या या क्षेत्रातील व्यक्तींच्या जीवनाबद्दल उत्सुकता असते आणि त्यांची मुलं मुली ,त्यांच्या बाबतीतले त्यांचे पालकत्व कसे असेल ? त्यांच्या सहवासात राहून आपोआपच मुलांचे व्यक्तिमत्त्व बहरत असेल का ? की कायम लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या व्यक्तीभोवती चाहत्यांचा गराडा असेल आणि मुलांसाठी किंवा कुटुंबीयांसाठी त्यांना वेळ मिळत नसेल ?अनेक दिग्गज लोकांचे घरात येणे जाणे असल्याने एक घरांदाजपणा चे असे संस्कार त्यांच्यावर होत असतील ?की सगळीकडे विशेष वागणूक मिळत असल्याने म्हणा किंवा आपले पालक कोणीतरी मोठे असल्याने त्यांच्या पाल्यांचे पाय जमिनीवर राहत नसतील ? असे अनेक प्रश्न मला नेहमीच पडतात. बरेचदा अशा लोकप्रिय बाबत समाजामध्ये अनेक वावड्या उठवण्याचे हे प्रकार होत असतात .त्याचा कितपत परिणाम मुलांवर होत असेल ? चार चौघात सहजतेने ही मुले मिळून मिसळून राहू शकत असतील का? कधीतरी असही वाटलं नक्कीच काहीतरी विशेष संस्कार किंवा प्रभाव पडत असणार आहे त्यांच्या मुलांच्या व्यक्तिमत्वावर ! नक्कीच काहीतरी वेगळे असेल त्यांच्या कुटुंबीयांचे जीवन ! अशा दिग्गजांच्या कुटुंबीयांनी , त्यांच्या पत्नी नी लिहिलेली आत्मचरित्रे ही वाचनात आलेली होती. नाच ग घुमा, आहे मनोहर तरी, हृदयस्थ, नाथ हा माझा इत्यादी.

आणि मग ठरवलं बघूया कसं असतं त्यांच्या मुलांच्या वाट्याला येणार त्यांचं पालकत्व ! मला सर्वप्रथम अाठवले ते मराठी बालकवीतेची मुहूर्तमेढ रोवणारे विंदा करंदीकर. आनंद ,उदय आणि जयश्री म्हणजे आत्ताची जयश्री काळे यांचे ते वडील. त्यांच्या पत्नी सुमा गोविंद करंदीकर यादेखील लेखिका. विंदांचे शिक्षण कोल्हापूरला झालेलं आणि हैदराबाद मुक्ती संग्रामात भाग घेऊन त्यांनी तुरुंगवास देखील भोगला होता. कोकणच्या आर्थिक मागासलेपणाबद्दल अतिशय संवेदनशील असलेल्या या लेखकाने रत्नागिरी आणि मुंबई येथे अध्यापनाचे कार्य स्वीकारले होते .साधे स्वावलंबी जीवन, काटेकोरपणा याबाबत आग्रही असलेले विंदा ! या सगळ्याचे प्रतिबिंब त्यांच्या आयुष्यावर पडलेले दिसत.

“सगळे मिळून सगळ्यांसाठी जगण्यामध्ये ब्रम्हानंद !”या आपल्या कवितेतील ओळींचा प्रत्यय आपल्या जीवनात ही दाखवणारे विंदा करंदीकर यांचे कुटुंब.

माहीमच्या बेडेकर सदनांमध्ये दोन खोल्यांच्या घरात स्वतःची तीन आणि कोकणातील भाचे मंडळी त्याच बरोबर स्वतःची बारा वर्षाची बहीण असे सगळे कुटुंब राहात असे .कॉलेजमधुन आल्यावर लगेचच दोन-अडीच तास दुसऱ्या दिवशी शिकवण्याची तयारी हा त्यांचा दैनंदिन कार्यक्रमाचा भाग. शेक्सपियरच्या किंग लियर आणि जर्मन महाकवी गटे यांच्या फाउस्त हे भाषांतर करताना एकेक शब्दाच्या अर्थ साठी दोन दोन दिवस झगडणारे त्यांच्या मुलांनी बघितले. त्यामुळे कुठलेही काम जीव झोकुन करणे, परफेक्शन या सवयी न कळतच मुलांमध्ये रुजल्या.

एकदा मुलं लहान असताना शेंदराचा रुमाल बोटावर धरून कपाळाच्या मध्यभागी घासला आणि एक हजार वेळा जय हनुमान म्हणून म्हंटले तर हनुमान प्रसन्न होतो अशी अफवा पसरली. त्यावेळी त्यांच्या मुलींनी असा प्रयोग केला आणि शेवटी व्हायचं तेच झालं, जखम झाली आणि खूप दुखू लागले. त्यावेळी त्यांच्या वडिलांनी घरी येऊन सर्वप्रथम त्यांच्या जखमेला मलम पट्टी केली .खाऊ घालून त्यांना झोपवलं आणि मग उठल्यावर समजावून सांगून असं परत होऊ नये म्हणून त्यांना दम देखील भरला.

मुलांना हँडल करण्याची ही त्यांची पद्धत ! कुठे मारपीट किंवा रागावणे हा प्रकार नाही. कोणत्याही बालकांचे मानसशास्त्राच्या अभ्यासाशिवाय मुलांशी वागण्याची त्यांची ही पद्धत ही त्यांची मुळातली संवेदनशीलता दाखवणारी आहे. त्याचा उपयोग पुढे चालून त्यांच्या मुलीला वस्तीतील महिलांना अंधश्रद्धेपासून दूर ठेवण्यासाठी झाला.

त्यांचा मुलगा उदय हा दचकून रात्री-बेरात्री किंचाळत उठायचा ोकांनी बर्‍याच मंत्रतंत्र अंगारे दृष्ट लागण्या बाबत सांगितले .पण अशा कठीण प्रसंगातही त्यांनी बुद्धी कौशल्याने मुलांसाठी काव्य लिहून अभिनय गीत म्हणून दाखवत दाखवत मुलाला त्यातून बाहेर काढले. मुलांच्या भावविश्वाशी समरस होऊन ते केल्यामुळेच यातून पुढे मराठी बालकवी त्याची सुरुवात करणारे ते ठरले.

अजून एक छान उदाहरण असे कि पाल्याच्या मनातील कटुता मत्सर दूर करायची असेल तर पालकांच्याही मनात ती नको. त्यांच्या मुलीच्या दोन मैत्रिणी आणि मुलगी या तिघी एकत्र अभ्यास करत असत. पात्र शिष्यवृत्ती मैत्रिणींना मिळाली मुलीला मिळाली नाही ,त्यावेळी ती नाराज झाली. त्यावर भाऊ म्हणजे विंदा एक दिवस पेढ्याचे तीन पुढे घेऊन आले आणि एक पेढा आई अभ्यास घेते म्हणून तिला दे ,एक तू खा .कारण शिष्यवृत्ती परीक्षेला तु बसलीस आणि अभ्यास केला हे पण तितकच महत्त्वाचं आहे असं तिला सांगितलं. आणि उरलेल्या दोन पुढे घेऊन ते मुलीसह त्या मैत्रिणींकडे घेऊन गेले. वास्तविक त्यासाठी मुलगी तयार होईना. पण त्यानंतर त्या दोन्हींकडे झालेला आनंद आणि आदरातिथ्य बघून, तिघी मैत्रिणी परत एक होऊन बागडू लागल्या. अशावेळी याउलट आई-वडिलांनीच तुलना केली असती तर त्यांच्या मनातला मत्सर वाढतच गेला असता. मुलांना कुठल्या माध्यमात घालायचे हा आजकालच्या ऐरणीवरचा प्रश्न पण विंदांनी मुलांना जाणीवपूर्वक मराठी माध्यमात घातले .कारण लहान वयात मातृभाषेतून शिक्षण घेण्याने विषयाचे आकलन चांगले होते आणि अभिरुचीसंपन्न आता येते हे त्यांचे मत होते ,पण त्या बरोबरच जगाची भाषा म्हणून इंग्रजी यायलाच हवी हेही ते जाणत होते .व्याकरण सारख्या रुक्ष माध्यमातून इंग्रजी शिकणे जड जाते या विचाराने त्यांनी प्रथम मुलांना “सॉमरसेट मॉम” आणि “मोंबासा “या लघु कथांची पुस्तके वाचायला दिली.

पुस्तके निवडतांना भाषा सोपी ,गोष्टी त्या त्या मुलांच्या वयाला आवडणाऱ्या ,त्यातील उत्सुकता टिकून राहिली अशा असाव्यात असं त्यांचं मत होतं. आजकाल मुलांना वाचनाची गोडी नाही ही पालकांची तक्रार असते त्यासाठी त्यांचे हे विचार प्रेरक आहे.

मुलांना त्यांच्या आपल्या आपल्या पसंतीचे जोडीदार निवडायला देखील त्यांनी परवानगी दिली होती. गणितात तसेच विज्ञान-तंत्रज्ञानात त्यांना रुची असल्याने सरसकट हाच दुरुस्तीची कामे त्यांना आवडत. त्याचबरोबर तबला उत्तम वाजवत. संगीताचीही त्यांना छान समज होती आणि त्यामुळे साहित्य व संगीत क्षेत्रातील अनेक उत्तम मान्यवर लोकांची त्यांच्या घरी कायम ये-जा होत असे त्यांच्या चर्चा, वादविवाद चालत त्यातूनच मग मोकळेपणाने स्वतःचे विचार मांडणे, इतरांचे समजून घेणे ,मतं वेगळी असली तरी परस्परांच्या मतांचा आदर करणे आणि मने जुळलेली ठेवण्याची शिकवण मुलांना मिळाली.

देणाऱ्याने देत जावे ,घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. हे केवळ कवितेतच नाही तर आपल्या जीवनात अमलात आणून मुलांना त्याची देणगी देणारे विंदा एक पालक म्हणूनही बरेच काही देणारे होते हे जाणवते.

मानसी गिरीश फडके
(समुपदेशक व सायकोथेरपिस्ट)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button