गोलंदाजांना आता विकेट मिळायची आणखी 1.38 इंच वाढीव संधी

Maharashtra Today

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) ने डिसीजन रिव्ह्यू सिस्टीममध्ये (DRS) गोलंदाजांना समाधान देणारे काही बदल केले आहेत. त्यानुसार पायचीत (LBW) चा निर्णय देण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या विकेट झोन (Wicket Zone) ची व्याख्या बदलली आहे. नव्या व्याख्येनुसार विकेट झोन आता यष्ट्यांवरील बेल्सच्या (Bails) वरच्या टोकापर्यंत असेल.यापूर्वी विकेट झोन बेल्सच्या खालच्या टोकापर्यंतच समजले जायचे. या नव्या बदलामुळे आता गोलंदाजांना 1.38 इंच (बेल्सची उंची) अधिक संधी मिळणार आहे.

बेल्सना केवळ स्पर्शून जाणाऱ्या चेंडूवर निर्णय घेताना अंपायर्स काॕल (Umpires Call) व्हायचा. आता तसे होणार नाही. ताज्या डीआरएस नियमावलीनुसार चेंडूचा अर्ध्यापेक्षा अधिक भाग विकेट झोनमध्ये लागणार असेल तर फलंदाज बाद असेल.

अंपायर्स काॕलबद्दल अलीकडे विराट कोहलीने नाराजी व्यक्त केली होती. इतरही बरेच कर्णधार व खेळाडू अंपायर्स काॕलबद्दल समाधानी नाहीत पण आयसीसी क्रिकेट समितीने अंपायर्स काॕल कायम ठेवले आहेत. अंपायर्स काॕल कायम राहणार याचा अर्थ साॕफ्ट सिग्नलही राहाणारच आहेत. भारताचे माजी कर्णधार अनिल कुंबळे हे या समितीचे अध्यक्ष आहेत.

पायचीतच्या निर्णयासाठी आयसीसीने विकेट झोनची व्याख्या बदलण्याची ही दुसरी वेळ आहे. 2016 मध्ये विकेट झोनची रुंदी वाढवण्यात आली होती. त्यानुसार चेंडूचा निम्मा भाग जरी आॕफ किंवा लेगकडील यष्टीला कोणत्याही ठिकाणी लागत असेल तरी फलंदाज बाद असेल अशी सुधारणा करण्यात आली होती.

आणखी एक बदल करण्यात आला आहे तो असा की, रिव्ह्यु घेण्याआधी फलंदाजाने चेंडू खेळायचा खरोखर प्रयत्न केला होता की नाही याबद्दल पंचांचे मत विचारू शकणार आहेत. शाॕर्ट रनचा निर्णय हा नो बॉलप्रमाणेच आता तिसऱ्या पंचांकडे सोपविण्यात आला आहे.

कोरोनाच्या साथीमुळे आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये यजमान देशांचे पंच वापरण्याची परवानगी पूर्ववत ठेवण्यात आली आहे. निष्पक्ष निर्णयासाठी संघांना प्रत्येक डावात एक जादा रिव्ह्यू घेता येणार आहे. चेंडू चमकावण्यासाठी लाळेच्या वापरावरील बंदी कायम आहे आणि कोवीड-19 सबस्टिट्यूटचीही तरतूद करण्यात आली आहे.

महिला क्रिकेट बाबतही काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार 5 षटकांचा ऐच्छिक पॉवर प्लेची तरतूद काढून घेण्यात आली आहे, आणि ‘टाय’ सामन्यांचा निर्णय आता सुपर ओव्हरने होणार आहे.

आयसीसीच्या पूर्ण सदस्य असलेल्या संघांना कसोटी व वन डे संघांचा दर्जा कायमसाठी देण्यात येणार आहे तर2022 च्या राष्ट्रकूल स्पर्धेतील सामन्यांना टी-20 इंटरनॕशनलचा दर्जा मिळणार आहे. महिला क्रिकेटची पहिली 19 वर्षाआतील विश्वचषक स्पर्धा आता 2021 च्या शेवटी न होता जानेवारी 2023 मध्ये होणार आहे. 2022 च्या विश्वचषक स्पर्धेसाठी महिलांची पात्रता स्पर्धासुध्दा आता डिसेंबर 2021 पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button